Gondia : पोलीस भरतीच्या सरावासाठी प्रल्हाद धावत होता, धावताना छातीत कळ आली आणि…
पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलेल्या 18 वर्षांच्या तरुणासोबत नियतीचा क्रूर खेळ!
गोंदिया : राज्यातील हजारो तरुण हे पोलीस भरती (Police Recruitment 2022) प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. पण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या काळजाचा ठोका चुकणावारी एक धक्कादायक घटना गोंदिया (Gondia News) जिल्ह्यामध्ये घडलीय. गोंदियात पोलीस भरतीचा सराव करतेवेळी एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचं वय अवघं 18 वर्ष होतं. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव प्रल्हाद मेश्राम (Pralhad Meshram) असल्याची माहिती समोर आली आहे.
नियतीचा क्रूर खेळ
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. तिरोडा तालुक्यामधील गराडा या गावातील पोलीस पाटील प्रकाश मेश्राम यांचा मुलगा प्रल्हाद मेश्राम या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी सराव करत होता. तो नेहमीप्रमाणे पहाटे धावायला गेला. पण जिवंत परतलाच नाही.
कुटुंबीय हादरले
18 वर्षीय तरुण मुलाच्या मृत्यूने मेश्राम कुटुंबीयांना मोठा धक्काच बसलाय. दररोज प्रल्हाद सकाळी धावायला जात असे. नेहमीप्रमाणेच तो पहाटे धावायला म्हणून घरातून निघाला. सकाळी साडे पाच वाजता प्रल्हाद घरातून निघाला.
सहा वाजण्याच्या दरम्यान, त्याच्या छातीत त्रास होऊ लागला. छातीत कळ येऊन प्रल्हाद अचानक खाली कोसळला. प्रल्हादच्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तेथील डॉक्टरांनी प्रल्हादचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यावर प्रल्हादच्या मित्रांच्या पायाखालची जमीनच सरकली.
ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली आणि अख्ख गाव हादरलं. नेहमी आपल्या मित्रांसोबत पोलीस भरतीचा सराव करायला येणाऱ्या प्रल्हादच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळेच धास्तावलेत. सगळ्यांनाच यावर विश्वास ठेवणं जड जातंय. प्रल्हादच्या मृत्यूने आता हळहळ व्यक्त केली जाते आहे.
तरुणांना हार्टअटॅकचा धोका?
गेल्या काही काळात तरुणांना हार्टअटॅकचा धोका वाढल्याचं दिसून आलंय. कोलेस्ट्रॉलचं शरीरातील वाढतं प्रमाण, मनासह मेंदूवर असलेला ताण या गोष्टीही हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरत असल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळे वेळोवेळी तरुणांनी स्ट्रेस टेस्ट, कोलेस्ट्रॉल टेस्ट करण्याचाही सल्ला दिला होता. दरम्यान, तरुणांमधील हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणाने चिंताही व्यक्त केली जातेय.