भूमिगत गटर योजनेच्या कामासाठी गेला कामगार; मातीच्या ढिगाराने त्याचे आयुष्यच बुजले
कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी नगरपरिषदेवर होती. पण,त्यांनी ती काळजी घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप कामगारांच्या वतीने करण्यात आला.
गोंदिया : गोंदिया शहरात नगरपरिषद सीमे अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वतीने काम सुरु आहे. या भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवर गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांत रोष आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज काम सुरू असताना दुर्घटना घडली. सिव्हिल लाईन, मामा चौक परिसरात भूमिगत गटार योजनेच्या १२ फूट खड्ड्यातील नालीमध्ये कामगाराला काम करावे लागले. या कामावरील एक मजूर खड्डयात पडला. त्याच्यावर मातीचा ढिगारा पडल्याने त्या मजुरांचा मृत्यू झाला. मृतक सुरेश नेवारे (वय ४० वर्ष) हा गोविंदपूर येथील रहिवासी आहे.
नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
काम करत असताना मजूर खड्डयात पडल्याची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्या कामगाराला बाहेर काढण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले. गोंदियातील अनेक नागरिकांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच येथील बांधकामाची तक्रार केली होती. मात्र नगर परिषदेचे प्रशासक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी या तक्रारींकडे कानाडोळा केला.
सुरक्षेची साधने नव्हती
कंत्राटदाराचा बचाव करण्याचीच भूमिका घेतली. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सिव्हिल लाईन, मामा चौक गोंदिया येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सदर मजुराला १२ फूट खोल खड्ड्यात काम करायचे होते. असे असतानासुद्धा त्याला कोणतीही सुरक्षेची साधन पुरविली नव्हती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी येथे यावे. मृत मजुराच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मोबदला द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली.
तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही
गोंदिया भूमिगत गटरयोजनेच्या खड्ड्यात पडून कामगाराचा मृत्यू झाला. काम सुरु असताना सुरक्षेतेची कोणतीही उपायोजना नाही. मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका मृतकाचे कुटुंबीयांनी घेतली. या घटनेमुळे परिसरात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
खड्ड्यात पडून कामगाराचा मृत्यू झाला. कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी नगरपरिषदेवर होती. पण,त्यांनी ती काळजी घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप कामगारांच्या वतीने करण्यात आला. तसेच मृतकाचे नातेवाईकही यावेळी आक्रमक झाले होते. मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, अशा पावित्रा त्यांनी घेतला होता.