Gondia Naxals | नक्षलवाद्यांनी सालेकसा पोलीस ठाण्याजवळ झळकवले पत्रक; कुणाचे केले समर्थन?
गोंदिया जिल्ह्यात नक्षली बॅनर व पोस्टर आढळल्यानं खळबळ उडाली. पोलिस स्टेशनच्या काही अंतरावरच पोस्टर व बॅनर मिळाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे नक्षलांनी चक्क सालेकसा पोलिस स्टेशनच्या 1 किलोमीटर अंतरावर हे बॅनर झळकावले.
गोंदिया : जिल्ह्यात नक्षली बॅनर व पोस्टर आढळल्यानं खळबळ उडाली. पोलिस स्टेशनच्या काही अंतरावरच पोस्टर व बॅनर मिळाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे नक्षलांनी चक्क सालेकसा पोलिस स्टेशनच्या (Saleksa police station) 1 किलोमीटर अंतरावर हे बॅनर झळकावले. सालेकसा- दरेकसा या रस्त्यावर शारदा मंदिराच्या परिसरात नक्षलवाद्यांनी बॅनर (Naxal Banner) लावत पोस्टरदेखील फेकले आहेत. सालेकसा हा तालुका नक्षलग्रस्त भाग असून या ठिकाणी अनेकदा नक्षल चळवळी होत असतात. या भागात सालेकसा-दरेकसा दलम कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांत नक्षल्यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते. पण, या घटनेने नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. छत्तीसगड पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि मध्यप्रदेश या पोलिसांची चौकी आहे. मुकुरडोह याठिकाणी ही चौकी आहे. हे अंतर सालेकसावरून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. तरीही नक्षलवादी या भागात छोट्यामोठ्या कारवाया करत असतात.
एसटी कर्मचाऱ्यांचे नक्षल्यांनी केले समर्थन
भारताची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड स्पेशल झोनल कमिचीच्या वतीनं हे पत्रक काढण्यात आलंय. अनंत नावाच्या झोनलच्या प्रवक्त्याची सही आहे. 21 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. परंतु, मुख्यमंत्री ठाकरे या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. परिवहन मंत्री हा संप सोडविण्यासाठी एकीकडं बैठका घेतात. तर दुसरीकडं संप चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न करतात. कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जात आहे. लाठीचार्ज केले जात आहे. पगारात 41 टक्के वाढ तसेच दर महिन्याच्या आठ तारखेला पगार देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.
कोणताही पक्ष एसटी कर्मचाऱ्याचे समर्थन करत नाही?
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नक्षलवाद्यांनी केली आहे. कोणताही राजकीय पक्ष या कर्मचाऱ्यांचे समर्थन करत नाही, याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सरकार एसटीच्या खासगीकरणाचे समर्थन करत आहे. जनतेला अपील करण्यात येत आहे की, त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे समर्थन करावे. त्यांच्या मागण्या मान्य कराव्या. कारण सामान्य जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे, असंही प्रवक्ता अनंत यांनी या पत्रकात म्हटलं आहे.