Crime | गोंदियातील खंडणी प्रकरणातील आरोपी पळाला, लॉकअपमधून बाहेर काढताच ठोकली धूम…
गोंदियातील खंडणी प्रकरणातील आरोपी दुर्गाप्रसाने आज सकाळी पोलिसांच्या हतावर तुरी दिल्या. शौचालयासाठी बाहेर काढले असता पोलिसाला झटका देऊन पळून गेला. त्यानंतर आवारभिंतीवर उडी मारली...
गोंदिया : आमगाव पोलीस ठाण्यातून (Amgaon Police Station) खंडणी आणि खुणाच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी पसार झाला. दुर्गाप्रसाद हरीणखेडे (Durga Prasad Harinkhede) असं या आरोपीचं नाव आहे. आज सकाळी आरोपीला शौचालयाकरिता लॉकअपमधून बाहेर काढण्यात आले. ही संधी हेरून पोलिसांच्या हातावर तुरी देत दुर्गाप्रसादने धूम ठोकली. दोन दिवसा आधी याच आरोपीने आमगाव शहराला लागून असलेल्या बनगावातील सतरा वर्षीय चेतन खोब्रागडे या तरुणाचे अपहरण (abduction case ) केले होते. दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर त्याचा खून केला.
पोलिसाला दिला झटका, भिंतीवरून मारली उडी
दुर्गाप्रसादने दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी बनगाव येथील एका सतरा वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला होता. आमगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी दुर्गाप्रसाद हा पोलीस कोठडीत होता. दुर्गाप्रसाद हा चोवीस वर्षांचा असून, मध्यप्रदेशातील नवेगाव खैरलांजी येथील रहिवासी आहे. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन आवारातच असलेल्या शौचालयात गेला होता. सोबत असलेल्या एकट्या पोलिसाला झटका दिला. तिथून पळ काढत भिंतीवरून उडी मारून पसार झाला. या प्रकारामुळे मृतकाच्या कुटुंबातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी आमगाव पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली. पोलीस कोठडीतून आरोपी फरार झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आमगाव पोलीस ठाणे चर्चेत
विशेष म्हणजे यापूर्वी याच पोलीस ठाण्यात एका आरोपीचा मारहाणीदरम्यान पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यावेळी सुध्दा पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित झालेले होते. आता या प्रकरणामुळे पुन्हा आमगाव पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. जेव्हा आमगाव पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय एकमेकाला लागूनच आहे. असे असताना असा प्रकार घडलाच कसा असा नागरिकांनी सवाल केला आहे.