बिरसी विमानतळावरील वाहतूक ठरली औटघटकेची, करार संपण्यापूर्वीच फ्लाय बिग कंपनीनं विमानसेवा का केली बंद
5 महिन्यांच्या कालावधीतच 9 ऑगस्टपासून विमान दुरूस्तीच्या व मेंटेनन्सच्या नावावर प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद केली.
गोंदिया – तालुक्यातील बिरसी येथे तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले. तसेच या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू सुध्दा करण्यात आले. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात प्रवासी विमान सेवा सुरू झाली नव्हती. भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री उड्डाण योजनेच्या सबसिडीवर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याची बाब मागील चार-पाच वर्षांपासून विचाराधीन होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या उड्डाण प्रकल्पांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी पाठपुरावा केला. नोएडा येथील फलाय बिग या खासगी विमान कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा करण्याचे कंत्राट घेतले. 13 मार्चपासून 2022 या विमानसेवेला प्रारंभ करण्यात आला.
गोंदिया-इंदोरा-हैदराबाद या विमानसेवेला सुरूवात करण्यात आली. त्याला प्रवाशांचासुध्दा चांगला प्रतिसाद मिळत होता. फ्लाय बिग कंपनीने ऑक्टोबरपर्यंत या विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याचा करार केला. 5 महिन्यांच्या कालावधीतच 9 ऑगस्टपासून विमान दुरूस्तीच्या व मेंटेनन्स च्या नावावर प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे जिल्हयासह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांसाठी ही सेवा औटघटकेची ठरली.
याबाबत मात्र बिरसी एयरपोर्ट प्राधिकरणवाले सतत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करत आहेत. लवकर फ्लाय बिग विमानसेवा सुरु करत असल्याचे अधिकारी सांगतात. तर, दुसरीकड़ं केवळ ही कंपनी सरकारच्या सबसिडीवर आपला आर्थिक फ़ायदा करून घेण्यासाठी असे काम करीत असल्याची ओरड सामाजिक कार्यकर्ता करत आहेत. याशिवाय या कंपनी अद्याप कर्मचाऱ्याचे पेमेंट न केल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोपाल अग्रवाल सांगतात.
दुसरीकडं ही विमानसेवा घाईत सुरू केली गेली. सरकारनं चुकीच्या कंपनीला विमान सेवेसाठी निवडल्याची ओरड माजी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. मी स्वतः विद्यमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटून विमानसेवा सुरू केल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणालेत. केवळ शोबाजी करण्यासाठी विमानसेवा घाईत सुरु झाली आहे.
बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून प्रवासी व कार्गो सेवा सुरू करण्याला वाव आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्य लागून आहे. शिवाय गोंदिया हे हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्वपूर्ण रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला चांगला वाव होता.
पुन्हा ही सेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि केंद्रात वजनाची गरज आहे. फ्लाय बिग कंपनीने 9 ते 21 आँगस्ट दरम्यान विमानांच्या देखभाल दुरूस्तीचे कारण देऊन पुढे सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले. मात्र 21 ऑगस्टनंतरही फ्लाय बिगने विमानसेवा सुरू केली नाही. त्यामुळे ही विमानसेवा कायमस्वरूपी बंद झाली तर नाही, अशी चर्चा आहे.