गुड न्यूज….वसई ते भाईंदर रो-रो प्रवासी फेरी बोट सेवा मंगळवारपासून सुरु, तिकीटदर किती ?
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसईच्या खाडी मार्गाने वसई ते भाईंदर अशी रो-रो प्रवासी फेरीबोट सुरु करण्यात येत आहे. या फेरीबोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व बोटीमधून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ-उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर, या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येईल.
मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : वसई आणि भाईंदर ही दोन शहर जलमार्गाने जोडली जाणार आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीत वसई ते भाईंदर रो-रो प्रवासी फेरीबोट उद्यापासून ( मंगळवार ) सुरु करण्यात येणार आहे. रो-रो प्रवासी बोटीतून प्रवाशांना आपल्या वाहनांना देखील घेऊन जाता येणार असल्याने ही सेवा प्रवाशांच्या अत्यंत फायद्याची ठरणार आहे. मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीस ही रो-रो फेरीबोट सेवा चालविण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकलने भाईंदर ते वसई या प्रवासासाठी कमी वेळ लागत असला तरी लोकलची गर्दी आणि इतर कारणांनी रो-रो प्रवासी बोट सेवा लोकप्रिय होईल असे म्हटले जात आहे.
जलमार्गाने प्रवासाचा वेळ आणि प्रदुषण वाहतूक कोंडीतून सुटका होत असते. त्यामुळे जलमार्गांची वाहतूक फायदेशीर ठरत असते. त्यामुळे वसईच्या खाडीत आता प्रायोगिक तत्वावर रो-रो प्रवासी फेरी बोट मंगळवारपासून सुरु करण्यात येणार आहे. या रो-रो सेवेमुळे प्रवाशांना आपल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांना बोटीतून घेऊन जाता येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना रस्ते मार्गाने वसई ते भाईंदर प्रवास करण्यापेक्षा जलमार्गाने वेळेची बचत आणि वाहतूक कोंडी तसेच प्रदुषणातून सुटका होणार आहे.
एका बोटीत किती प्रवासी बसतील
या रो-रो बोटीत एका फेरीत 100 प्रवासी आणि 33 गाड्या वाहून नेण्याची क्षमता आहे. मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला कोकण किनारपट्टीवर राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड या खाड्यांमध्ये रो-रो फेरीबोट सेवा चालविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. वसई ते भाईंदर या फेरीबोट सेवेकरिता सध्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.
प्रवासी आणि वाहनांचा दर
1. मोटारसायकल ( चालकासह ) रु. 60 /-
2. रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर ( चालकासह ) रु. 100/-
3. चारचाकी वाहन ( कार ) (चालकासह) रु. 180/-
4. मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. ( प्रति टोपली ) रु. 40/- व कुत्रा, शेळी, मेंढी ( प्रति नग ) रु.40 /-
5. प्रवासी प्रौढ (12 वर्षावरील ) – रु. 30/-
6. प्रवासी लहान ( 3 ते 12 वर्षापर्यंत ) – रु. 15 /-