ST Bus Reservation : लालपरीच्या नव्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
एसटीच्या प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट बुक करता यावे ऑनलाईन तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या ऑनलाईन सेवेद्वारे मोबाईलवर देखील तिकीट बुक करता येत आहे. एसटी महामंडळाने या सेवेतील अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन देखील जारी केले आहेत.
मुंबई : एसटीच्या तिकीट आरक्षणासाठी असलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आधुनिकीकरण झाले आहे. 1 जानेवारी 2024 पासून एसटीच्या तिकीटाचे आरक्षण प्रणालीची आधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे एसटीच्या तिकीटांचे आरक्षण आता झटपट होत आहे. पूर्वीप्रमाणे एसटीचे तिकीट ऑनलाईन बुक करताना अडचणी येत नाहीत. एसटीच्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीद्वारे 1 जानेवारी 2024 ते 20 मे 2024 या दरम्यान 12 लाख 92 हजार तिकीटांची विक्री झाली आहे. याच काळात गेल्यावर्षी 9 लाख 75 हजार तिकीटांची विक्री झाली होती. याचा अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तीन लाख अधिक तिकीटे विकली गेली आहेत. सध्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे 10 हजार तिकीटे काढली जात आहेत.
एसटीच्या प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट बुक करता यावे यासाठी एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच आपल्या स्मार्टफोन मोबाईलवर MSRTC Bus Reservation ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट बुक करता येत आहे. या दोन्ही पध्दतीव्दारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये 1 जानेवारी, 2024 पासून बदल करुन ती आधुनिक करण्यात आली. परिणामी त्यातील अनेक त्रूटी दूर झाल्याने ही ऑनलाईन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी आणि सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीव्दारे प्रवाशांना अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतीचे देखील आगाऊ आरक्षण मिळत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर
एसटी प्रवाशांनी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation मोबाईल ॲपचा वापर करावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. ऑनलाईन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास 7738087103 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. हा नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी 24 तास सुरु असणार आहे. तसेच ऑनलाईन आरक्षण करताना पैसे भरुन देखील तिकीटे बुक न होणे ( पेमेंट गेट वे संदर्भात ) या तक्रारींसाठी 0120-4456456 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.