गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखला, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली.
चंद्रपूर: पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोखल्याचा प्रकार पहायला मिळाला. घोडाझरी कालव्याची पाहणी करुन निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा प्रकल्पग्रस्तांनी रोखला. त्यावेळी गाडीतून खाली उतरत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. गेल्या 35 वर्षांपासून शेतीला पाणी मिळत नसल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुनही शेती तहानलेलीच असल्याची खंत यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. (Gosekhurd project victims blocked the Chief Minister’s convoy)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तसंच घोडाझरी शाखा कालवा इथं सुरु असलेल्या कामाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पुढील दौऱ्यावर निघाले असता, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा ताफा अडवला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
घोडाझरी शाखा कालवा पाहणी
घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या 36.76 किलोमीटरवरुन घोडाझरी शाखा कालवा सुरु होतो. त्याची एकूण लांबी 55 किलोमीटर आहे. या कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके येतात. त्यात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल आणि सावली तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यांमधील 19 गावांमध्ये 2 हजार 906 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं.
गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या 3 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन करा, अशा सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पाला लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावं. तसंच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
विकासाची कामं करताना पर्यावरणाचा समतोल राखला जावा. नाग नदीमुळं प्रदुषण होणार नाही या दृष्टीनं नाग नदी प्रदूषणासंदर्भात दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार गौतम, विभागीय आयुक्त संजीवकुमार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता अंकूर देसाई यांच्यासह काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर, सिंचन प्रकल्पांची पाहणी करणार
ठाकरे मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार
Gosekhurd project victims blocked the Chief Minister’s convoy