तीन वर्षांपासून 61 कोटींचे अनुदान थकले; नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मदतीसाठी सरकारकडे डोळे!
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 61 कोटी 2 लाख 34 हजारांचे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी थकित आहे. त्यामुळे यावर्षीची ठाकरे सरकारने घोषित केलेली मदत केव्हा मिळणार, असा सवाल शेतकरी करत आहे.
मनोज कुलकर्णी, नाशिकः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 61 कोटी 2 लाख 34 हजारांचे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी थकित आहे. त्यामुळे यावर्षीची ठाकरे सरकारने घोषित केलेली मदत केव्हा मिळणार, असा सवाल शेतकरी करत आहे.
नाशिक जिल्ह्यावर 2018 पासून कुठले ना कुठले तरी नैसर्गिक संकट घोंगावतेच आहे. अतिवृष्टी, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस याने शेतकरी पिचला जातो आहे. ही संकटे आली की, सरकार मदतीची घोषणा करते. मात्र, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही, हेच समोर येत आहे. आता 2020-21 मध्ये 28 कोटी 69 लाख 1 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. विशेष म्हणजे यातच तोक्ते चक्रीवादळ, 2019 मध्ये झालेली अतिवृष्टी आणि इतर मदतीचा समावेश आहे. मात्र, एक अनुदान जाहीर केले की दुसऱ्याला कात्री लावली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फक्त आश्वासने पडतात. गेल्या तीन वर्षांचा विचार करता शेतपिकांचे 5555.87 लाखांचे अनुदान सरकार दरबारी थकले आहे. जनावरांचे 116.49 लाख आणि घरे, झोपड्या उद्धवस्त झाल्याचे 426.92 लाख तर गोठ्यांचे 3.06 लाख अनुदान थकित आहे. असे एकूण 61 कोटी 2 लाख 34 हजारांचे अनुदान थकित आहे.
अतिवृष्टीने नाशिक जिल्ह्यात यावर्षी अक्षरशः थैमान घातले. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख 71 हजार हेक्टरवरचे पीक पाण्यात गेल्याचे पंचनाम्यातून उघड झाले आहे. त्याचा तडाखा जिल्ह्यातील दोन लाख 24 हजार 919 शेतकऱ्यांना बसला आहे. मालेगाव, मनमाडमध्ये दोन-दोनदा पुराचे तडाखे बसले. त्यात सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ पीक उद्धवस्त झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आहे. या नुकसानीचे भयावह आकडे आता समोर येत आहेत. जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवचे पीक पाण्यात गेले आहे. या नुकसानीपोटी जिरायती पिकासाठी मदत म्हणून 8957.01 लाखांची मागणी करण्यात आली आहे. बागायत पिकासाठी 4367.98 लाखांच्या निधीची मागणी केली आहे. वार्षिक फळपिकांसाठी 18.35 लाख, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी 1377.99 लाखांची अशी एकूण 147 कोटी 21 लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. नांदगाव-मालेगावमध्ये पावसाने कांद्याची उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष व डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या आहेत. अनेक घरांवरील वाऱ्यामुळे पत्रे उडाले आहेत. अनेक घरे पडली आहेत. हे पाहता, शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले. मात्र, गेल्या तीन वर्षांपूर्वीची मदत अजून मिळाली नाही. मग ही मदत कधी हाती पडणार, हे येणारा काळच सांगेल.
धरणे ओसंडली
नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.
अजून पावसाची शक्यता
महाराष्ट्रातून काढता पाय घेतलेला मान्सून मध्य व दक्षिण भारतात आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे.
इतर बातम्याः
अमळनेरात परिवर्तनाची नांदी; नागरिकांनी वेश्या व्यवसायाला विरोध करणारे घराबाहेर लावले फलक!
अमृत महोत्सवानिमित्त भुजबळांनी सोडला नेत्रदानाचा संकल्प; 74 लाख नागरिकांना मोहिमेत सहभागी करून घेणार
अमळनेरात परिवर्तनाची नांदी; नागरिकांनी वेश्या व्यवसायाला विरोध करणारे घराबाहेर लावले फलक!https://t.co/XHk3szdp5X#Amalner|#prostitutionbusiness|#Police|#crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2021