पालकमंत्री होताच दादा भुसे अॅक्शन मोडमध्ये, नाशिकसाठी भुसेंचा ‘हा’ आहे प्लॅन…
पालकमंत्री होताच दादा भुसे यांनी सर्वच विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister ) दादा भुसे (Dada Bhuse) हे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पालकमंत्री झाल्यानंतर त्याचा जिल्ह्याचा आढावा घेणारा पहिलाच दौरा आजच्या दिवशी आखण्यात आला आहे. नाशिकचे (Nashik) ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचे दर्शन घेऊन पालकमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. खरंतर नाशिकच्या पालकमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता अनेकांना लागलेली होती. त्यातच भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदी निवड निश्चित मानली जात होती. त्यातच पालकमंत्री दादा भुसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. मात्र, पालकमंत्री होताच दादा भुसे यांनी सर्वच विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
आज संपूर्ण दिवस पालकमंत्री दादा भुसे हे खासदार,आमदारांच्या बैठका घेत असून विविध विभागाच्या बैठका नियोजित आहे.
त्यात शिक्षण संस्थांचे प्रमुख आणि शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक संस्थांचे प्रमुख आणि पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या आहे.
याशिवाय सर्वच शासकीय विभागाच्या प्रमुखांच्या बैठका नियोजित असून खासदार, आमदारांच्या बैठका देखील घेतल्या जाणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांची जबाबदारी मोठी मानली जात असून शिंदे गटासह, भाजपची बाजू भक्कमपणे लढवावी लागणार आहे.
नाशिक जिल्ह्याला अग्रस्थानी नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भुसे यांनी कालिका मंदिरातून बाहेर पडतांना माध्यमांना दिली होती.
आगामी काळात कुंभमेळा असल्याने त्याची पूर्वतयारी देखील भुसे यांनाच करावी लागणार आहे. याशिवाय भुसे यांना शहरासह ग्रामीण भागातील नाराज नागरिकांना खुश करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील विकास गेल्या काही महिन्यायासून खुंटला असल्याने त्यांची भरपाई करण्याची कसरतही भुसे यांना करावी लागणार आहे, आणि त्याचाच पाहिला टप्पा भुसे यांनी आज पार पाडला आहे.
माजी पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यापेक्षा सरस काम करण्यासाठी दादा भुसे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि नागरिक यांच्याशी जुळवून घेत आहे.
आजच्या दिवसभराच्या दौऱ्यात दादा भुसे यांच्या निवडीवरुन त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांचेकडे विविध कामांच्या संदर्भात मागणी करण्यात आली आहे.
याच सर्व प्रलंबित कामांना गती देण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या नियोजन मंडळाच्या बैठकीत कामे मार्गी लावले जाईल अशी आश्वस्त करण्याची भूमिका आज पालकमंत्री भुसे पडतांना दिसून आले.