अहो ऐकलं का राव, चक्क पेरूनं खाल्लाय भाव; राज्यातील ‘या’ बाजारपेठेत मासळीपेक्षा पेरू महाग
पेरूच नव्हे तर राज्यातील भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसाने यंदा दिवाळीपर्यंत राज्यातील विविध भागात धुमाकूळ घातला.
![अहो ऐकलं का राव, चक्क पेरूनं खाल्लाय भाव; राज्यातील 'या' बाजारपेठेत मासळीपेक्षा पेरू महाग अहो ऐकलं का राव, चक्क पेरूनं खाल्लाय भाव; राज्यातील 'या' बाजारपेठेत मासळीपेक्षा पेरू महाग](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/11/02194040/guava.jpg?w=1280)
सांगली: कुणी आपल्या असण्याने भाव खातात तर कुणी आपल्या दिसण्याने. त्यात जमानाच महागाईचा (inflation) असल्याने आजकाल कुणी, कधी आणि किती भाव खावून जाईल सांगता येत नाही. तर सध्या ही भाव खाण्याची बारी आहे जम्बो पेरूची (guava). सांगली जिल्ह्यातील (sangli) पलूस परिसरात फळांचा राजा आंबा, देशी केळी, द्राक्ष, सफरचंद, तर विदेशी किवी, ड्रेगनफ्रूट आदी फळे बाजारात नेहमीच चांगला भाव खावून जातात. मात्र आता बलवर्धक अशी ओळख असणाऱ्या पेरूने या सगळ्यांची जागा घेतलीय. मासळीपेक्षाही पेरूचा भाव अधिक असल्याने येथील ग्रामस्थही हैराण झाले आहेत.
सध्या आजूबाजूच्या गावात पिकणाऱ्या जम्बो पेरूला पलूस बाजारपेठेसह परिसरात सध्या मोठी मागणी आहे. आकाराने मोठा असल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा हा पेरू सध्या सफरचंदापेक्षा महाग झाल्याचे चित्र फळ बाजारात पहायला मिळत आहे.
यामुळे 10-20 रुपयांना विकल्या जाणारा पेरू आता चक्क 100 रुपये किलोवर पोहचला आहे. मासळींचे दर 50 ते 100 रुपयांपासून सुरू होतात. तिथे पेरूच 100 रुपये किलोच्यावर विकला जात असल्याने ग्राहकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बिया कमी असणाऱ्या या जम्बो पेरूचा आकार आणि हा पेरू चवीचा गोडवा ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. मऊ मधाळ गोडवा देणारा गर असणारा हा पेरू हाताळण्यासाठी त्यावर सुरक्षित जाळीचे आवरण चढवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना इतर फळांपेक्षा पेरूचे अधिकच आकर्षण वाटत आहे.
आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे बहुगुणी, बलवर्धक, गुणकारी असलेला हा पेरू सध्या तरी 100 रुपयांना किलो ते दीड किलो मिळणाऱ्या सफरचंदाला भारी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
तर आज पलूस बाजारपेठेत क्वालिटीनुसार पेरूचा दर 100 ते 120 रू. किलोने असल्याचे येथील फळविक्रेता सुरेश हराळे यांनी सांगितले.
दरम्यान, पेरूच नव्हे तर राज्यातील भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसाने यंदा दिवाळीपर्यंत राज्यातील विविध भागात धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यात भाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाज्यांच्या दारात वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला मात्र झळ बसत आहे.