मराठा आरक्षण : सरकारची बाजू हरिश साळवे मांडणार
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी राज्य सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा आरक्षण विषयातले इतर वकीलही असतील. कोर्टात कायदा टिकेल याची खबरदारी सरकारने घेतली असल्याचा दावा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. कोर्टात कुणी तरी जाईल हे कायदा करत असतानाच आम्हाला माहित होतं. आम्ही […]
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी राज्य सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा आरक्षण विषयातले इतर वकीलही असतील. कोर्टात कायदा टिकेल याची खबरदारी सरकारने घेतली असल्याचा दावा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला.
कोर्टात कुणी तरी जाईल हे कायदा करत असतानाच आम्हाला माहित होतं. आम्ही आरक्षण दिलं म्हणून विरोधी पक्षांचा जळफळाट होत आहे. आम्हाला फायदा होईल हे त्यांना बघवत नाही. ज्यांच्या पोटात दुखतंय ते असं करणार हे माहित असल्यामुळे सरकार सज्ज आहे. कोर्टात कायदा टिकेल याची जबाबदारी सरकारची असल्याचं विनोद तावडे म्हणाले.
याचिकेवर कोर्टात काय होऊ शकतं?
वकील गुणरत्न सदावर्ते यांची मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मुख्य न्यायाधीशांसमोर ठेवली जाऊ शकते. मुख्य न्यायाधीश याचिका कुठल्या न्यायमूर्तींकडे सुनावणीसाठी द्यायची हे ठरवतील. ती याचिका असाईन केलेल्या न्यायमूर्तींकडे गेल्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित होईल.
हरिश साळवे कोण आहेत?
मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलीय, ते हरिश साळवे महाराष्ट्र आणि भारतच काय, संपूर्ण जगासाठीही नवे नाहीत. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणारे हेच हरिश साळवे आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या वकिलांची बोलती बंद करत भारताची बाजू मांडली होती. हे प्रकरण संपूर्ण जगाने पाहिलं होतं.
सलमान खानलाही वाचवलं
मुंबई सेशन्स कोर्टाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर सलमान आणि कुटुंबीयांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. सलमानला थेट तुरुंगात नेलं जाणार असल्याचीही चर्चा झाली. मात्र तेव्हाच वरिष्ठ वकील हरिश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला. हरिश साळवे खास सलमानसाठी दिल्लीतून मुंबईत आले होते.
हरिश साळवेंची कारकीर्द
बॅरिस्टर हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43 व्या क्रमांकावर आहे. हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. घरातूनच वकिलीचं बाळकडू मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली.
कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती. टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली आणि त्यांचं नाव देशभरात गाजलं. केंद्र सरकारसोबतच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली होती. इतकंच नाही, तर बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली. सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली होती.