आधी फडणवीसांकडून दिल्लीत जाऊन मोदी-शाहांची भेट, नंतर सिंग यांचं पत्रं, म्हणून संशय बळावला : हसन मुश्रीफ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी पोलीस अधिकारी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परमबीर सिंग यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
कोल्हापूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी पोलीस अधिकारी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे भाजपचं षडयंत्र आहे. आधी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शाहांना भेटले आणि मग परमबीर सिंगांनी हे पत्र लिहिलंय. त्यामुळेच संशय बळावल्याची भूमिका त्यांनी मांडली (Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis and BJP over Parambir Singh letter).
हसन मुश्रीफ म्हणाले, “परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाण प्रयत्न आहे. अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळ्यात (TRP Scam) प्रकरणात भाजप त्यांच्यावर नाराज होता. त्यानंतर आता सचिन वाझे प्रकरणातून सिंग यांना वाचवण्यासाठीच हे कारस्थान सुरु आहे. देवेंद्र फडणवीस आधी दिल्लीत जाऊन बसले होते. तेथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज (20 मार्च) सिंग यांनी हे पत्र दिलं म्हणून माझा संशय बळावला आहे.”
“परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न होतोय. हे भाजपचं कटकारस्थान आहे. ही ‘सोची समाझी चाल’ आहे. यात चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये. भाजप सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे,” असाही आरोप हसन मुश्रीफ यांनी केलाय.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा : तृप्ती देसाई
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई म्हणाल्या, “राज्यात नेमकं काय चाललं आहे, हे महाविकासआघाडी सरकार आहे की “महावसुली सरकार”आहे. राज्यातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले. महिलांच्या हत्येचे आरोप करण्यात आले. काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले, परंतु कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. अशी अनेक प्रकरणे दडपली गेली आणि आता वाझे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत. व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.”
“गृहमंत्री पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात. खंडणी वसूल करायला सांगतात आणि हे जेव्हा पुराव्यानिशी समोर येतं तेव्हा तातडीने नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तरच हे सरकार पारदर्शक आहे असे म्हणता येईल,” असंही तृप्ती देसाई यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
parambir singh letter | गृहमंत्री अनिल देशमुखांवर टांगती तलवार; जयंत पाटील म्हणाले…
Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!
व्हिडीओ पाहा :
Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis and BJP over Parambir Singh letter