कोल्हापूर : गेल्या काही दिवसांत ईडीच्या कारवाया थांबल्या होत्या. पणष आता पुन्हा ईडी अक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीच्या नजरेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आलेत. १२ तास ईडीने मुश्रीफांच्या घरी छापेमारी केली. यावरून पुन्हा भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आलेत. छापे पडल्यानंतर हसन मुश्रीफ म्हणाले, ईडी कोण चालविते. इनकम टॅक्स कोण चालविते, असा सवाल केला. तर हसन मुश्रीफ यांचा काउंडडाऊन सुरू झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या घरासह ठिकठिकाणी छापे टाकले. कागलच्या घरी, हसन मुश्रीफ यांच्या मुलाचं घर, मुश्रीफ यांच्या मुलीचं घर, घोरपडे साखर कारखान्यावरही धाड पडली.
पुण्यामध्ये ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या चंद्रकांत गायकवाड यांच्यावरही छापे पडले. मुश्रीफ यांचे समर्थक प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापे पडले. पुण्यात कोंडवा, कोरेगाव पार्क, गणेशखिंड या ठिकाणी ईडीचे अधिकारी धडकले.
सकाळी साडेसहा वाजता ईडी आणि आयकरचे २० अधिकारी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या घरी धडकले. त्यानंतर झाडाझडती सुरू झाली.
कोलकात्यातील बनावट कंपन्यांमधून १५८ कोटी रुपये संताजी घोरपडे साखर कारखान्यात ट्रान्सफर झाले. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. मंत्री असताना ग्रामविकास खात्याकडून जावयाला १५०० कोटी रुपयांचा टेंडर दिल्याचा आरोप आहे.
किरीट सोमय्या यांनी लावलेले हे सर्व आरोप हसन मुश्रीफ यांना फेटाळले आहेत. यापूर्वी ईडीचा कुठलाही गुन्हा नोंद नाही. समन्स नाही. या कारखान्याशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या कंपनीचा ते उल्लेख करतात त्या कंपनीचाही माझ्याशी दुरान्वयानं संबंध नसल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात आधी अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये गेले. नुकतेच ते जामिनावर बाहेर आलेत. देशमुख 1 वर्ष 2 महिने जेलमध्ये राहिले. नवाब मलिक फेब्रुवारी 2022पासून जेलमध्येच आहेत. आणि आता हसन मुश्रीफ ईडीच्या टार्गेटवर आलेत.
मुश्रीफ आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीनं एकाचवेळी छापे टाकलेत. त्यामुळं ईडी आणि आयकर विभागाच्या हाती या छाप्यातून काय लागतं, त्यावर पुढची कारवाई अवलंबून असेल.