घासूनपुसून काम करा, तुमचे संबंध इलेक्शननंतर, कुणाच्या घरी चहा… जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना भरला दम
hatkanangale lok sabha jayant patil: महाविकास आघाडी उमेदवारांसाठी सर्वांनी घासून-पुसून काम करायच आहे. कोणाच्या घरी, कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही. कोणीही आले, घरात बसले, आम्ही काय करू, असला धंदा बंद करा.
महाविकास आघाडीमधील सर्व ४८ मतदार संघातील जागा वाटप पूर्ण झाले आहेत. त्यात सांगलीमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सत्यजीत पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. कोणाच्या घरी, कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही, असा दमही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना भरला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दमच भरला. त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडी उमेदवारांसाठी सर्वांनी घासून-पुसून काम करायच आहे. कोणाच्या घरी, कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही. कोणीही आले, घरात बसले, आम्ही काय करू, असला धंदा बंद करा. अचानक कोणी घरी आले तर तुम्ही घरी जाऊ नका, बाहेर जावा. सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे तुमचे वैयक्तीक संबंध असतील ते इलेक्शननंतर. आपणास आधी महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणायचे आहे.
ही निवडणूक विधासभेची तालीम
लोकसभेची ही निवडणूक म्हणजे विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम आहे, असे जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यासाठी तुम्ही बुथचे नियोजन करा. आपणास मतदारसंघात शेवटच्या मतदारांपर्यंत जावे लागणार आहे. यामुळे बुथवरील मतदानाचा अभ्यास करा. या ठिकाणी आपला उमेदवार शिवसेना उबाठाचा आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी काम करायचे आहे.
हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्ष राष्ट्रवादीने राज्य केले आहे. गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे राजू शेट्टी यांचा विजय झाला होता. शिवसेनेचे धैर्यशील माने यांचा पराभव झाला होता. आता धैर्यशील माने पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.