एसटी रिव्हर्स घेताना पाठीमागे उभे न राहिल्याने वाहकाला जबर दंड, पाहा कुठे घडली घटना
एसटी बसला मागे घेताना ड्रायव्हराला दिशादर्शनासाठी मागे उभे राहून मार्गदर्शन करावे लागते. परंतू एका प्रकरणात एका कंडक्टरवर या कामात निष्काळजी दाखवल्याने जबर दंड ठोठावल्याचा प्रकार घडला आहे.
मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : एसटी महामंडळाचा गाड्यांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला दळणवळणाचे स्वस्त साधन मिळत असल्याने एसटीला ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हटले जाते. एसटी महामंडळाला त्याच्या शिस्तबद्ध व्यवहारासाठी ओळखले जाते. एसटीच्या अपघाताचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. एसटी महामंडळाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी एसटी महामंडळ आपल्या चालकांना कठोर प्रशिक्षण देत असते. एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांसाठी कठोर नियम ठेवण्यात आले आहेत. अशाच एका प्रकरणात चालकाला बस मागे घेताना साईड न दाखविल्याने एका महिला कंडक्टर जबर दंड ठोठावण्यात आला आहे.
हे प्रकरण नागपुरातील वर्धमान नगर येथील आहे. नागपूर- तिरोडा कामगिरी पूर्ण केल्यानंतर वाहन क्रमांक एम.एच. 40 एन 9994 फेरी क्रमांक 60 या बसचे चालक गणेशपेठ बस स्थानकावर ही बस चालक प्लॅटफॉर्मवर लावीत असताना कंडक्टर बसच्या पाठीमागे साईड दाखविण्यासाठी उभा न राहिल्याचे निदर्शनास आले आहे. 3 मे 2023 रोजी घडलेल्या या प्रकरणात ड्रायव्हरला दिशा दर्शनासाठी कंडक्टर उपलब्ध नसल्याने अपघात किंवा जिवीतहानी घडण्याचा धोका होता. त्यामुळे या प्रकरणी कंडक्टर प्रतिभा धांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतू त्यास समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यामुळे या महिला कंडक्टरना दोषी मानून त्यांना 1830 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही रक्कम दोन समान हप्त्यात त्यांच्या पगारातून कापण्यात येणार आहे. तसेच पुन्हा असा प्रकार केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे या कंडक्टरला पाठविलेल्या नोटीस म्हटले आहे.
विनावातानुकूलीत शयनयान सेवा
एसटी महामंडळाला कोरोनाकाळात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. एसटी महामंडळात गेली अनेक वर्षे नवीन बसेसची खरेदी न झाल्याने एसटीला गाड्यांची टंचाई जाणवत आहे. महामंडळात जुन्या एसटी गाड्यांचे प्रमाण मोठे आहे. आता एसटी महामंडळाने नवीन गाड्या घेण्यासाठी कंत्राट काढले आहे. लवकर या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात सामावून सेवेत येतील अशी आशा आहे. एसटी महामंडळाने अलिकडेच आपल्या ताफ्यात 50 विनावातानुकूलित स्लीपर कोच ( शयनयान ) गाड्या समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच मुंबई सेंट्रल – बोरीवली ते कोकणातील बांदा या मार्गावर 31 प्रवाशी क्षमता असलेली विनावातानुकूलित स्लीपर कोच सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा लवकरच पणजीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.