मराठवाडा, विदर्भाला अतिवृष्टीचा फटका, जनावरे दगावली; उभी पिकं आडवी झाली, अनेक महामार्ग पाण्याखाली
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना अक्षरश: झोडपलं आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून पावसाचा फटका बसल्याने जनजीवन अतिशय विस्कळीत झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना अक्षरश: झोडपलं आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून पावसाचा फटका बसल्याने जनजीवन अतिशय विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पावसामुळे घर, मालमत्ता शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक ठिकाणी महामार्ग ही पाण्यात गेले आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत तर काही ठिकाणी पाण्यात अनेक जनावरंही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या २४ तासांत ७१ मिलिमीटर पाऊस झाला. बीड, लातूर, धाराशिव, जालना जिल्ह्यांनाही पावसाचे झोडपून काढले. नांदेड जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं असून अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. जिल्ह्यतील 45 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. कालपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नांदेडमधील आसना नदीला पूर आला असून धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम पाण्यात गेल्याने शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परभणीत पिकांचं मोठं नुकसान
परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत झालेल्या पावसाने पिकांतं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 52 महसूल मंडळापैकी 50 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून 2 लाख 12 हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, कापूस, मूग, हळद आदी अनेक पिकांचे नुकसान झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी दोन दिवसात 132 मिलिमीटर इतका पाऊस झाला, या मुसळधार पावसाने वार्षिक सरासरीचा टप्पा पार केला. 1 जून पासून आज पर्यंत 664 मिलिमीटर इतका पाऊस झाला तर वार्षिक सरासरी 615 मिलिमीटर इतकी आहे. काल संध्याकाळपासून पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे.
हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्ण उघडले
दरम्यान हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्ण उघडले आहेत, धरणातून 97 हजार 046क्युसेक ने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. झालेल्या पावसामुळे हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली, त्यामुळे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे कार नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
छ. संभाजीनगरमध्ये मोटारसायकल स्वार गेला वाहून
दरम्यान छ. संभाजीनगरमध्ये एक बाईकस्वार आणि त्याची मोटारसायकल असे दोघेही वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. धाड नदीला आलेल्या पुरात मोटरसायकल सह मोटार सायकलचालक वाहून गेला. मोटार सायकल वाचवण्याच्या प्रयत्नात चालकही वाहून गेला, ही धक्कादायक घटना मोबाईल मध्ये कैद झाली. त्यामुळे एकच गोंधळ माजला.
तर फुलंब्री तालुक्यातील शेवता गावात 45 वर्षीय व्यक्ती पुरात वाहून गेली. शेवता परिसरातील नदीला आलेल्या पुरात ही व्यक्ती वाहून गेली , ती घटनाही कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली. 14 तासानंतरही वाहून गेलेला व्यक्ती अद्याप आढळलेली नाही.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी
दरम्यान पावसचा फटका बसल्यानंतर पालकमंत्री अब्दुलसत्तार यांनी येथे पुराच्या पाण्याचा वेढा पडलेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. कळमनुरी तालुक्यातील डोगरगाव पुल ह्या गावात पालकमंत्री अब्दुल सत्तार दाखल झाले. त्यांनी तेथे पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. डोगरगाव पुल ह्या गावाला कायादु नदीचा वेढा पडला होता .