राज्यात पावसाचे कमबॅक, कुठे दरड कोसळली तर अनेक भागात नद्यांना पूर, दुबार पेरणीचं संकट टळलं ?
राज्यातील काही भागात पावसाने जोरदार आषाढी सरी बरसवल्याने बळीराजा सुखावला असला तर सिंधुदुर्गातील 27 गावे पाण्याखाली गेली आहेत. उल्हासनदीला पूर आल्याने पनवेल शहरात अनेक भागात घरात पाणी गेले आहे. मोहने गावात एकाचा उल्हासनदीत बुडून मृत्यू झाला आहे.
मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे.जून महिन्यात वेळेत सुरुवात झाल्यानंतर पुन्हा पावसाने काही भागात दडी मारली होती. आता जुलै महिन्यात पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केल्याने राज्यातील अनेक भागात नद्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. तर कासाडी नदीचं पाणी पनवेल शहरात अनेकांच्या घरात शिरल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पडघे गावात पुराचं पाणी शिरल्याने मुसळधार पावसाचा फटका गावांना देखील बसला आहे. कल्याण जवळील मोहने गावात उल्हासनदीत एकाचा मृतदेह सापडला आहे. सिंधुदुर्गात 27 गावांचा संपर्क तुटला आहे. राजापूरात अर्जूना नदीला पूर आला आहे.
जाेरदार पावसाने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आळवाडी परिसरात पुराचे पाणी भरले आहे. बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. तर माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी भरले आहे, माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
पनवेल येथे पाणी साचले
पनवेल येथील आदई आणि सुकापूर भागातील गावांमध्ये पाणी भरू लागले आहे. रस्ते आणि सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. उरण- पनवेल हायवे रोडवर पाणी साचलं आहे. मध्यरात्रीपासून पनवेल शहरात पावसाची दमदार हजेरी लावल्याने रोडवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. साचलेल्या पाण्यातून दुचाकीस्वारांना आपला मार्ग काढावा लागत आहे.
मुंबईत शहरात सर्वाधिक पावसाची नोंद
मुंबईमध्ये रात्री l वाजल्यापासून रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. सकाळी आठवाजेपर्यंत मुंबई शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात 47.51 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात 36.23 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपगरात 19.60 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.रस्ते आणि सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
खडवलीचा मुख्य ब्रिज पाण्याखाली
उल्हासनगरात खडवलीचा मुख्य ब्रिज पाण्याखाली गेल्याने पाच ते सहा गावाचा संपर्क तुटला आहे.उल्हासनगरातील रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे टिटवाळा- खडवली दरम्यान असलेल्या मुख्य फळेगाव रुंदे गावातील मुख्य ब्रिज पाण्याखाली पाण्याखाली गेला आहे.अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी सुखावले आहेत.
भंडारदरा धरणात मुसळधार
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात अर्धा टीएमसी पाण्याची विक्रमी आवक पाणलोट क्षेत्रात झाली आहे. ५२१ दशलक्ष घनफूट पाणी धरणात नव्याने दाखल झाले आहे. घाटघर,पांजरे आणि रतनवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणाचा पाणीसाठा २४ टक्क्यांवर पोहचला आहे.
बदलापूरात पाण्याची पातळी ओसरली
मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटींग झाल्याने बदलापुरच्या उल्हास नदीचा प्रवाह वाढल्याने उल्हास नदी चौपाटी पाण्याखाली गेली होती..घाटावर पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्यरात्रीपासूनच बदलापूर शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे.
महाबळेश्वर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
महाबळेश्वर तापोळा रोडवर दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरड आणि मातीचा ढीगारा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसामुळे या परिसरात कायम दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. चिखली जवळच्या घाटात वारंवार दरडी कोसळत असल्याने तापोळासह दरेगावला जाणारा रस्ता बंद झाला आहे. महाबळेश्वरमध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे.
नागपूरला यलो अलर्ट
शहरातील काही भागात रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरींना सुरवात झाली आहे.शहरातील काही भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.जुलै महिन्यात दमदार पावसाचा अपेक्षा असून अजूनही हवा तसा पाऊस पडलेला नसल्याचे म्हटले जात आहे.हवामान विभागाकडून हलक्या मध्यम स्वरूपाचा सरींसह यलो अलर्ट दिला आहे.
सांगलीत बळीराजा सुखावला, 46.8% टक्के धरण भरले
जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून दमदार पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. चांदोली परिसरामध्ये चिक्कलगुट्टात भात रोप लागलीस सुरुवात झाली आहे. यावर्षी आतापर्यंत 941 मिलिमीटर पाऊस पडला असून 16,038 क्यूसेक पाणी धरणांमध्ये येत आहे. तर नदीपात्रात 675 मिलिमीटर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. आत्तापर्यंत ( 15.85 टीएमसी ) 46.8% टक्के धरण भरले आहे.
टिटवाळा – रायते पुल पाण्याखाली जाण्याची भीती
कल्याण- डोंबिवली सह टिटवाळा खडवली परिसरातील नदीची आणि खाडी परिसरातील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळील काळू नदी सह उल्हास नदीची ही पातळी वाढली आहे. नदीची आणि खाडीची वाढती पातळी पाहता प्रशासनाकडून नदी आणि खाडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर उल्हास नदीची पातळी अजून वाढली तर कल्याण नगर मार्गावर असलेला टिटवाळा – रायते पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईला पाणी टंचाई ? धरणक्षेत्रात पाऊस रुसला
ठाणे जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे.एमआयडीसीच्या मालकीच्या बारवी धरणात अवघा २७ टक्के % तर आंध्रा धरणात अवघा २६ टक्के % पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आठवड्यापर्यंत जोरदार पाऊस न झाल्यास १५ जुलैनंतर पाणीकपातीचे संकट गडद होणार आहे.
ठाणे-नाशिक महामार्गावर खड्यांचे साम्राज्य कायम
ठाणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरले आहे. तर दुसरीकडे महामार्गावरती अर्धवट कामांमुळे वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. खड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अंदाज देखील येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यानंतरही यंत्रणा या ठिकाणी काम करताना दिसत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे कधी बुजवले जाणार ? असा सवाल प्रवासी वर्ग करीत आहे.