अजितदादांच्या या योजनेवर बच्चू कडू यांचा आक्षेप, काय केली मागणी ?
एकीकडे सत्ताधारी पक्षांच्या योजनांवर टीका करतानाच विरोधी पक्ष कॉंग्रेसवरही बच्चू कडू यांनी टीका केली आहे. कॉंग्रेसने जर चांगले काम केले असते तर भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार आले असते का? असाही सवाल यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.

नेहमीच वंचित समुहासाठी आणि शेतकऱ्यासाठी बाजू मांडणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी सरकारला पुन्हा घरचा आहेर दिला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प काल मांडला आहे. या अर्थसंकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या योजना जाहीर केल्या आहेत. त्याचे स्वागत सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केले असले तरी त्यांनी अजितदादांच्या एका योजनेबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत योजना जाहीर केल्या आहेत परंतू त्यासाठी पाच एकरापेक्षा कमी जमीन ही अट योग्य नाही असे बच्चू कडू यांनी सांगितले.
राज्य सरकारचे अंतरिम बजेट काल सादर करण्यात आले. परंतू या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना एक अट घातली आहे. ज्याची जमीन पाच एकर आहे, त्यांना आर्थिक मदत मिळणार नाही. ही अटच चुकीची आहे. पाच एकराची जमीन असलेला शेतकरी आत्महत्या करीत नाही का ? असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांची वर्गवारी सरकारने करायला हवी होती. इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी, न भरणारा शेतकरी अशी वर्गवारी करायला हवी होती. हे देखील पाहायला हवे, पाच एकर हून कमी जमीन असणाऱ्यांना मदत केली जाणार आहे. परंतू जर जमीन एक ते दोन एकर आहे. परंतू ही शेतजमीन जर नागपूर, पूणे शहरापासून एक ते दोन किलोमीटर असेल तर त्याला मदतीची गरज नाही. त्यामुळे पाच एकराहून कमी जमीन ही अट दूर करावी असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
योजनांचे पैसे वेळेवर मिळत नाही
ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत रोजगार सेवक हे गाव स्तरावर काम करतात आणि त्यांचे पगार कित्येक महिने होत नाहीयेत. त्यांना सेवेत आणायला हवं. नगर पालिकेत काम करणाऱ्याला दादा सेवेत आणतात यांना का नाही ? दिव्यांगांना तीन महिने झाले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने एक वर्षापासून 200 रुपये दिलेले नाही, श्रावणबाळ योजनेचे आपण 1300 रुपये देतो. परंतू वेळेवर पैसे मिळत नाहीत असे बच्चू कडू यांनी म्हटले आहेत.
तर कॉंग्रेसचे सरकार आले असते !
कॉंग्रेसने आमच्याच योजना सरकारने कॉपी केल्या अशी टीका केली आहे. त्यावर बच्चू कडू यांनी कॉंग्रेसला जमले नाही म्हणून तर भाजपाचे आणि शिवसेनेचे सरकार आले आहे. नाही तर त्यांचे आले असते असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. महिलांसाठीच्या लाडकी बहीण योजनेचे बच्चू कडू यांनी स्वागत केले आहे. सत्ताधारी पक्ष राजकारण करणारचं परंतू या योजनेतून जनतेचा फायदा होत आहे हे महत्वाचे असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, आपण सभागृह संपल्यावर सबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतो आणि ताबडतोब यावर निर्णय घेतो. गरिबांचे पैसे 5 तारखेपर्यंत कसे दिले जातील यावर निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात आश्वासन दिले आहे.