शिंदे गटाला मोठा धक्का, 6 टर्म नगरसेविका राहिलेल्या डॉ. हेमलता पाटील यांचा रामराम
मलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम केले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला होता आणि नंतर शिंदे गटात सामील झाल्या होत्या. मात्र, पक्षाला योग्य न्याय देऊ शकत नसल्याचे कारण देत त्यांनी पुन्हा राजीनामा दिला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता हेमलता पाटील यांनी शिंदे गटाला रामराम केलं आहे. मी पक्षाला योग्य न्याय देऊ शकत नाही, असे कारण देत हेमलता पाटील यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
हेमलता पाटील यांनी नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे हेमलता पाटील यांनी शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. या व्हिडीओत त्यांनी शिंदे गटाचा राजीनामा देण्यामागचे कारण काय, शिंदे गटानंतर त्या कोणत्या पक्षात जाणार याबद्दलही त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
हेमलता पाटील काय म्हणाल्या?
“गेल्या ३५ वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी इच्छुक असताना मला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पण शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड दोन महिन्यांमध्ये मी या पक्षाला योग्य तो न्याय देऊ शकत नाही. योग्य ते काम करु शकत नाही, अशी माझी स्वत:ची प्रामाणिक भावना झाली. त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षात काम करायचे नाही असे ठरवलं आहे. कारण एखाद्या पक्षात आपण काम करतो, तेव्हा प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, त्या पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे. पण तसा न्याय मी देऊ शकत नाही. त्यामुळे सध्या मी कोणत्याही पक्षात काम करणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून एक सामाजिक चळवळीसाठी अनेक संघटनांच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांच्या सोबत आहेत. यापुढेही मी तुमच्या सोबत नाही. आजपर्यंत तुम्ही जसे मला सहकार्य दिले, आशीर्वाद दिले, तसेच आशीर्वाद यापुढेही द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करते”, असे हेमलता पाटील म्हणाल्या.
राजकीय वर्तुळात धक्का
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर हेमलता पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश कला होता. त्यांनी तब्बल 30 ते 35 वर्षे काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्या नाराज झाल्या होत्या. याच नाराजीतून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता हेमलता पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात धक्का बसला आहे.
आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्या कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसून एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपले कार्य सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात त्यांची राजकीय दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.