उपचाराचं बिल पाहून चक्कर, बोईसरमध्ये रुग्णाची हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
बोईसर येथील चिन्मय हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Patient suicide by jumping from hospital in Boisar).
पालघर : बोईसर येथील चिन्मय हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Patient suicide by jumping from hospital in Boisar). चंद्रकांत चौधरी (वय 42) असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. चंद्रकांत चौधरी बोईसर येथील शुक्ला कंपाऊंड येथे राहत होते. या घटनेमुळे बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत चौधरी यांना 15 सप्टेंबर रोजी किडनी स्टोनचा त्रास झाल्याने बोईसर येथील चिन्मय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी आपल्या उपचाराचं रुग्णालयाचं बिल पाहून त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना पुन्हा याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र, 19 सप्टेंबर रोजी कोणालाही न सांगता त्यांना पहाटे 4 वाजताच्या सुमारास अतिदक्षता विभागातून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.
या घटनाक्रमानंतर चंद्रकांत चौधरी यांनी त्यांना दाखल केलेल्या वार्डच्या समोरील रुममधून खाली उडी मारली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर चौधरी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन डॉक्टरांनी उपचार केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रकांत चौधरी हे मूळचे जळगावचे रहिवासी असून त्यांची पत्नी हयात नाही. ते आपली मुलगी आणि आई-वडिलांसोबत बोईसर येथील शुक्ला कंपाऊंड येथे राहत होते. बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनुफार्मा या कंपनीत ते कामाला होते. चौधरी यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार संशयास्पद असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी बोईसर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
ठाण्यात 72 वर्षीय कोरोना रुग्णाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या
मुंबईत चित्रकार रामचंद्र कामत यांची आत्महत्या, बाथटबमध्ये मृतदेह सापडला
व्हिडीओ पाहा :
Patient suicide by jumping from hospital in Boisar