Hijab| हिजाबच्या निर्णयाविरुद्ध मालेगावमध्ये एल्गार; ‘राष्ट्रवादी’च्या रणरागिणी रस्त्यावर!
कर्नाटक सरकारने उडपीतला निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने दिला आहे.
मालेगावः कर्नाटकमधील (Karnataka) हिजाब (Hijab) प्रकरणाविरोधात मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कर्नाटक सरकारविरोधात यावेळी सुपर मार्केट परिसरात विद्यार्थिनींनी जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटकमध्ये साधारण 23 दिवसांपूर्वी उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून हा वाद सुरू झाला आहे. शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले की, हा वाद सुरू होण्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली आहे. या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.
सरकारच्या भूमिकेचा निषेध
मालेगावमध्ये कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. कर्नाटकात सत्ताधारी भाजप सरकारने विद्यार्थिनींसाठी ड्रेसकोड तयार केला आहे. यात हिजाब व बुरख्याला विरोध करत मुस्लिम विद्यार्थिनींना महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. बुरखा व हिजाब परिधान करून शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना ड्रेसकोडची सक्ती केली जात आहे. या निर्णयास विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारुन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. निषेधाचे फलक घेत सुपर मार्केट परिसरात रॅली काढली.
अन्यथा आंदोलन तीव्र
कर्नाटक सरकारने उडपीतला निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने दिला आहे. या आंदोलनाला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आगामी काळात नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुका आहेत. तत्पूर्वीच हा वाद पेटलाय. येणाऱ्या काळात हे प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तो व्हिडिओ कुठला?
कर्नाटकातील एका शैक्षणिक संस्थेवरील तिरंगा काढून तेथे भगवा झेंडा फडकवण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तो शिमोगा येथील असल्याचा दावा केला जात आहे. शिमोगा येथे आज सकाळी दगडफेकही करण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून वातावरण निवळेपर्यंत महाविद्यालयांना सुटी घोषित करण्याच्या तयारीत येथील सरकार आहे. अन्य एका व्हिडिओमध्ये कॉलेजसमोर हिजाब घातलेल्या मुलीसमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर ती मुलगी ‘अल्लाहू अकबर’ म्हणत आहे.
इतर बातम्याः
Narendra Modi | …तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच, इतिहास बदलण्याच्या आरोपावर मोदींचं उत्तर