हिलरी क्लिंटन औरंगाबादेत, आज घृष्णेश्वर, वेरूळ लेण्यांना भेट, ‘या’फार्म हाऊसवर मुक्काम!
गळवारी दुपारी त्या औरंगाबादेत पोहोचल्या. आज बुधवारी हिलरी क्लिंटन घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर त्या वेरूळ लेण्या पाहण्यासाठी रवाना होतील.
औरंगाबादः अमेरिकेच्या (America) माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या (Ellora Caves) पाहण्याची त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. कोरोना संकटापूर्वीच त्यांचा भारतात औरंगाबाद दौऱ्यावर येण्याचा विचार होता, मात्र कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. अखेर हिलरी क्लिंटन मंगळवारी औरंगाबादेत दाखल झाल्या आहेत. हिलरी यांच्या सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी त्या औरंगाबादेत पोहोचल्या. आज बुधवारी हिलरी क्लिंटन घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर त्या वेरूळ लेण्या पाहण्यासाठी रवाना होतील.
कोणत्या फार्म हाऊसवर मुक्काम?
जागतिक पर्यटन स्थळ असल्याने औरंगाबादला विदेशी पाहुणे नवीन नाहीत. असंख्य पर्यटक इथे येत असतात, येथील लेण्या तसेच पुरातन वास्तुंवर अभ्यास करतात. मात्र यापैकी बहुतांश पर्यटक, अभ्यासक, अधिकारी हे पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात.
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी मात्र खुलताबाद येथील फार्म हाऊसवर राहण्याला पसंती दिली. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या अपर्णा फळणीकर आणि सहज शर्मा यांच्या ध्यान फार्मवर त्यांनी मंगळवारचा मुक्काम केला.
औरंगाबाद चिकलठाणा विनातळापासून ४६ किलोमीटर अंतरावर हे फार्म हाऊस आहे. हिलरी क्लिंटन यांच्या मुक्कामाचे ठिकाण जाहीर झाल्यानंतर हे फार्म हाऊस नेमके कुठे आहे, याची शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर तिथे सुरक्षा व्यवस्था देण्यात आली.
मैत्रिणीने दिला सल्ला
सहज शर्मा आणि अपर्णा फळणीकर यांचे खुलताबाद जवळीले हे फार्म हाऊस फारसे कुणाला माहिती नाही. मात्र येथे विदेशातील पाहुणे येतात, एवढीच गावकऱ्यांना कल्पना आहे. २००८ मध्ये या दोन सहकाऱ्यांनी एअरवेज नावाची टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी स्थापन केली. विदेशातील पाहुण्यांना भारतीय उपखंडातील संस्कृती व जीवनशैलीचा अनुभव देणे हा त्यांचा उद्देश आहे.
या कंपनीच्या संपर्कात आलेल्या एका मैत्रीणीने हिलरी क्लिंटन यांना सदर फार्म हाऊसमध्ये राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातेतून औरंगाबादेत
हिलरी क्लिंटन यांनी सोमवारी सेल्फ एम्प्लॉइड विमेंस असोसिएशनच्या सहाकार्याने वातावरण बदलाविरोधातील मोहिमेत काम करणाऱ्या महिलांसाठी पाच कोटी जॉलरच्या ग्लोबल क्लायमेट रेझिलिएन्स फंडची घोषणा केली. वातावरण बदलाविरोधात लढा देण्यासाठी हा निधी महिला आणि इतर समुहांना सक्षम करेल. गुजरातेतील या कार्यक्रमानंतर हिलरी क्लिंटन औरंगाबादेत आल्या.