Hindi Sabha | गांधीजींच्या प्रेरणेने 1944 मध्ये सुरू झालेल्या हिंदी सभेचा अमृत महोत्सव सुरू; राज्यपाल म्हणतात की…
मुंबईः मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी वृत्तपत्रांमधील व विशेषतः पुरवण्यांमधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण व अभिरुचीसंपन्न असल्याचे आपण पहिले आहे. हे समृद्ध साहित्य व लेख हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातील पत्रकार, साहित्यिक तसेच मुंबई हिंदी सभेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने 1944 साली सुरू झालेल्या आणि मंत्री […]
मुंबईः मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी वृत्तपत्रांमधील व विशेषतः पुरवण्यांमधील लेख अतिशय अभ्यासपूर्ण व अभिरुचीसंपन्न असल्याचे आपण पहिले आहे. हे समृद्ध साहित्य व लेख हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातील पत्रकार, साहित्यिक तसेच मुंबई हिंदी सभेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने 1944 साली सुरू झालेल्या आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कुलपती असलेल्या मुंबई हिंदी सभा या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुंबई हिंदी सभेचे कुलपती तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय हिंदी संचालनालयातील उपसंचालक डॉ. राकेश शर्मा, पत्रकार डॉ. वर्षा सोळंकी, सभेचे कुलगुरू विजय परदेशी, महासचिव सूर्यकांत नागवेकर व कोषाध्यक्ष देवदत्त साळवी प्रामुख्याने उपस्थित होते.
बिगर हिंदी भाषकांचे योगदान मोठे
आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले स्वामी विवेकानंद बंगाली भाषिक असले तरीही ते शिकागो येथे उत्कृष्ट इंग्रजी भाषेत बोलले व अल्मोडा येथे आले असताना लोकांशी हिंदी भाषेतून बोलले. महर्षी दयानंद यांनी देखील हिंदी भाषेत काम सुरू केले. महात्मा गांधी यांनी देशाला जोडण्यासाठी हिंदुस्तानी भाषेचा पुरस्कार केला, यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे सांगताना हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारात बिगर हिंदी भाषिकांचे योगदान कितीतरी पटीने मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली पाहिजे, मात्र मराठी येत नसेल तर हिंदी बोलली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
हिंदी परस्परांना जोडते
हिंदी भाषा तोडणारी नसून परस्परांना जोडणारी भाषा असून हिंदी भाषेमुळे आपल्याला उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यातील लोकांशी सहजपणे संवाद साधणे शक्य होत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. हिंदी भाषा समृद्ध करण्यामध्ये अमृता प्रीतम, महादेवी वर्मा, मुन्शी प्रेमचंद आदी साहित्यिकांचे जसे योगदान आहे, तसेच हिंदी चित्रपट सृष्टी, हास्यकवी व सामान्य लोकांचे योगदान असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. हिंदी भाषेचा प्रचार प्रसार देशभर होऊन देश जोडला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते हिंदी भाषा प्रचार-प्रसाराकरिता समर्पित निवडक लोकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इतर बातम्याः
Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?
Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन