मोबाईल नाही, कानाला फक्त बोट लावून बोला, हिंगोलीतील तरुणाचं संशोधन
ऑडिओ ब्लूटूथचा पर्याय आहेच, पण हिंगोलीतील एका तरुणाने ध्वनी लहरींच्या माध्यमातून कानाला बोट लावून बोलण्याची सोय केली आहे. त्याच्या या संशोधनाची सध्या जोरदार चर्चा आहे.
हिंगोली : सध्या एकापेक्षा एक वरचढ मोबाईल येत आहेत आणि वायरलेस उपकरणांची मागणीही तेवढीच आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणं गुन्हा आहे, त्यामुळे हल्ली वायरलेस उपकरणांची मागणी वाढली आहे. ऑडिओ ब्लूटूथचा पर्याय आहेच, पण हिंगोलीतील एका तरुणाने ध्वनी लहरींच्या माध्यमातून कानाला बोट लावून बोलण्याची सोय केली आहे. त्याच्या या संशोधनाची सध्या जोरदार चर्चा आहे.
शिक्षण फक्त आठवी पास, पण ध्वनी लहरींपासून बोलता येईल असा शोध स्वतः लावलाय. मूळचे जालना जिल्ह्यातील असलेले रवी क्षीरसागर यांचा हा शोध आहे. सध्या ते कामानिमित्त हिंगोलीत राहतात. ते सध्या वाहन चालक म्हणून काम करतात. रवी यांनी लावलेल्या शोधानुसार , फोन उचलण्यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नाही. आपण ज्या पद्धतीने हातात घड्याळ घालतो, त्याच पद्धतीचं उपकरण तयार करण्यात आलंय, ज्यात एक ब्लूटूथ किट, ऑडिओ बोल्ड, बॅटरी आणि कॉईलचा समावेश आहे.
उपकरण हाताला बांधल्यानंतर फोन आल्यावर कानाला हाताचं कोणतंही एक बोट लावा आणि बोलणं सुरु करा. तुम्ही कुणाला फोन केल्यानंतरही याच पद्धतीने बोलू शकता. रवीने तयार केलेलं उपकरण चार्जिंगवर चालतं. एकदा चार्जिंग केल्यास तुम्ही दोन तास हे वायरलेस उपकरण वापरु शकता.
विशेष म्हणजे संशोधन करण्याची रवीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जालन्यात असताना जीपीएसच्या आधारावर एक भन्नाट सोध रवीने लावला होता. गाडी चोरीला गेल्यास गाडीत असलेल्या जीपीएसमार्फत मालकाला आपोआप फोन येणारा शोध रवीने लावला होता. सध्या तो अपघातापासून बचाव करणारं यंत्र बनवण्याच्या तयारीत आहे.