हिंगोली : गाईच्या वासरा(Cow Calf)ला शेळी (Goat) दूध पाजताना कधी पाहिलंय का? हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण हे सत्य आहे. हे विहंगम दृश्य बघून लोक आश्चर्यचकित झालेत. औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातल्या पिंपळदरी इथलं हे दृश्य आहे. धम्मादीप बबन भगत यांच्याकडे गुरं, शेळ्या, पटावरील बैल आहेत. ते खूप जीव ओतून या सर्वांचं संगोपन करतात. त्यांनी पटावरच्या बैलांप्रमाणेच इतर प्राण्यांचीही माणसाप्रमाणं नाव ठेवली आहेत. त्यांच्या या कुटुंबातच हा एक अनोखा प्रकार घडला आहे.
दिवसभर ढाळत होती अश्रू
त्यांच्याकडे राणी नावाच्या गाईबरोबर मनी नावाची शेळी सोबतच राहायची, सोबतच चरायची. त्या दोघींना एकमेकींच्या शेजारीच बांधावं लागायंच, कारण त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. पण दुर्दैवानं राणी या गायीचा पहिल्या वितात मृत्यू झाला आणि हे बघून राणी अक्षरश: दिवसभर अश्रू ढाळत होती. जन्मलेलं वासरू तिच्या शेजारी भूकेनं व्याकुळ झालं होतं. त्याचवेळी मनी या शेळीनं वासराला स्वतःच दूध पाजून भूक भागवली, मात्र हे केवळ एकदा नाही तर सलग दोन महिने…
Video : नात्यागोत्यांच्या पलिकडचा लळा! गाईच्या वासराला शेळीनं पाजलं दूध..!#goats #cow #calf #MILK #farmer #hingoli #Maharashtra pic.twitter.com/YRi6TZgIuZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 24, 2022
मुक्या जनावरानं घालून दिला आदर्श
यापूर्वी मनीने एक पिल्लू दिलं होतं, पण ते काही दिवसातच मृत्यू पावलं. त्यामुळे मनी वासराला दूध पाजू शकत होती. वासराचा लागलेला लळा तिला परत पिल्लं झाल्यानंतरही सुटला नाही. आज ही मनी तिच्या दोन पिल्लांबरोबर वासराला पाजत असते. आईच्या पश्चात सावत्र आई मुलांचा सांभाळ करीत नसताना मनी या मुक्या जनावरानं गाईच्या वासराला लावलेला लळा नात्यागोत्यांच्या पलीकडला आहे.