जमिनीच्या मोबदल्याचा वाद विकोपाला; भाऊ बनला भावाचा वैरी
वडिलांच्या नावाची काही जमीन होती. ती जमीन तळ्याच्या कामात गेली. त्याचा त्यांना मोबदला मिळाला.
हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण येथे शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना उघडकीस आली आहे. चंद्रभान कोरडे असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. भावाभावातील वाद हा काही नवीन विषय नाही. घराच्या, जमिनीच्या वाटपावरून असे वाद होत असतात. अशीच एक घटना हिंगोली तालुक्यात घडली. दोन भावांचा जमिनीच्या मोबदल्याच्या पैशावरून वाद झाला. या वादाचा शेवट अतिशय वाईट झाला. भावाने दुसऱ्या भावाला संपवले. १२ मार्च रोजी भांडेगाव शिवारात सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रभान कोरडे यांचा मृ्त्यू
वडिलांच्या नावाची काही जमीन होती. ती जमीन तळ्याच्या कामात गेली. त्याचा त्यांना मोबदला मिळाला. या मोबदल्यावरून चंद्रभान कोरडे आणि मारोती कोरडे यांच्यात वाद होता.हा वाद काल सकाळी विकोपाला गेला. यात चंद्रभान यशवंता कोरडे (वय ४५) यांचा मृ्त्यू झाला. नवलगव्हाण येथील राहणारे होते.
चार जणांविरोधात गुन्हा दाखल
घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. विनोद चंद्रभान कोरडे यांनी तक्रार केली. त्यानुसार, मारोती यशवंता कोरडे, बालाबाई मारोती कोरडे, ज्ञानेश्वर खंडागळे (रा. एकसालपूर, ता. रिसोड) संतोष मुकीर (रा. चिंचाबाक, ता. रिसोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे तपास करत आहेत.
या घटनेमुळे कोरडे कुटुंबात खळबळ माजली. एकीकडे एका कुटुंबाचा प्रमुख गेला. तर दुसरीकडे दुसऱ्या कुटुंबातील लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे कोरडे कुटुंबीयात दुःखाच वातावरण आहे. वडिलांच्या हिस्साची जमीन भावांमध्ये वाटली जाते. तसेच जमिनीचा मोबदला योग्य प्रमाणात वाटप केला जावा, अशी अशी मागणी होती. त्यावरून हा वाद झाला. हा वाद काल शेवटी विकोपाला गेला. त्यातून चंद्रभान कोरडे यांचा खून करण्यात आला. या खुनाच्या आरोपात भावासह आणखी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.