राज्यात सध्या रावणरूपी सरकार, त्यांचं दहन उध्दव ठाकरे आपल्या विचाराने करतील; कुणी केला घणाघात?
Ambadas Danve on CM Eknath Shinde : राज्यातील सरकार रावणरूपी, संतोष बांगर नमक हरामी माणूस; शिंदे सरकारवर कुणी डागलं टीकास्त्र. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी ठाकरे गटाच्या नेत्यांनं शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
हिंगोली | 27 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. उध्दव ठाकरे यांची आज दुपारी निर्धार सभा होणार आहे. हिंगोलीतील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. पक्षफुटी नंतर उध्दव ठाकरे पहिल्यांदाचा हिंगोली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. मात्र या सभेआधी आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका केली. त्यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे. राज्यातील सरकार रावणरूपी असल्याचं ते म्हणालेत.
राज्यात सध्या रावनरूपी सरकार आहे. त्यांचे वेगवेगळे दहा तोंडं आहेत. त्यांची वेगळी रूपं आहेत. त्याच दहन उध्दव ठाकरे आपल्या विचाराने करतील, असं अंबादास दानवे म्हणालेत. तसंच संतोष बांगर यांच्यावरही अंबादास दानवे यांनी थेट निशाणा साधला आहे. संतोष बांगर हे नमक हराम आहेत. संतोष बांगर यांनी जुना काळ आठवावा ते काय धंदे करायचे ते. ते का तडीपार होते? त्यांना कोणी वाचवलं आहे. मागच्या इतिहासात गेलं पाहिजे. मगच बोललं पाहिजे जर ते सगळं आठवून ते बोलत नसतील तर ही नमक हरामी आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
हिंगोलीमधील सभा ऐतिहासिक होईल यात शंका नाही. उध्दव ठाकरे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी देशाचं लक्ष लागले असतं. कोणत्याही व्यक्ती विरोधात ही सभा होणार नाही. ज्यांनी गद्दारी केली. त्या लोकांना जनता धडा शिकवेल, असं अंबादास दानवे म्हणाले.
संतोष बांगर काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत सभा होतेय. यावर शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांनी टीका केली आहे. उध्दव ठाकरे यांनी आधी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या रावणांचं दहन करावं. आज त्या रावणांचं दहन उध्दव ठाकरे करतील असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंच्या सभेने कुठलाही फरक पडणार नाही. हिंगोली जिल्ह्यात शिवसेना फुटलीच नाही. उद्या हजारोच्या संख्येने लोक कावड यात्रेत येणार आहेत. , असं म्हणत संतोष बांगर यांनी निशाणा साधला. त्याला आता अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं आहे.
शासन आपल्यादारी म्हणतात कधी शासन यांचं शेतात राहतं तर कधी दिल्लीला राहतं! कधी स्वतःला कोंडून घेतात… शासनाने कोणते दिवे लावले, हे सांगावं. ठाणे मुंबईच्या बाहेर मुख्यमंत्री जात नाही. शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार बीडला जात आहेत. पण योग्य उद्देश कुणाचा आहे हे जनतेला माहीत आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर टीकास्त्र डागलं आहे.