Hingoli Crime : लहान मुलाच्या गळ्यावर सुरा ठेवत घर लुटलं! हिंगोलीत डॉक्टरच्या घरात सिनेमात दाखवात तशी डिट्टो चोरी
Hingoli Robbery : पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकूनच दरोडेखोरांनी हाती आलेली रक्कम आणि ऐवज घेऊन घरातून पळ काढला.
हिंगोली : हिंगोलीत (Hingoli Crime News) सात वर्षांच्या मुलाच्या गळ्यावर सुरा ठेवत डॉक्टरच्या घरात जबरी चोरी करण्यात आली. रविवारी पहाटे करण्यात आलेल्या या जबरी चोरीच्या घटनेनं संपूर्ण हिंगोलीत खळबळ माजली आहे. डॉक्टर सचिन देशमुख यांच्या घरात ही चोरीची (Robbery) घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनाही कळवण्यात आलं. पण तोपर्यंत चोरट्यांनी सात लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला होता. घरात सामानाची मोडतोड करत चोरड्यांनी डॉक्टर देशमुखांच्या घरावर सशस्त्र दरोडाच घातला. हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर इथं नवी बस स्थानकाजवळ डॉक्टर देशमुख यांचं हॉस्पिटल आहे. तर तिथंच वरच्या मजल्यावर देशमुख हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. आधी कम्पाऊंडरला दरोडेखोरांना मारहाण केली. त्यानंतर ते डॉक्टरच्या बेडरुमचा दरवाजा तोडून आत घुसले आणि त्यांनी दहशत माजवली.
धक्कादायक
रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यावेळी काही दरोडेखोर स्कॉर्पिओ कारने दवाखान्याजवळ पोहोचले. त्यांनी दवाखान्याची मागची ग्रील तोडली. त्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला. दवाखान्यात असलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये कर्मचारी विशाल होळगे हा जखमी झाला आणि जागीच कोसळला.
दरवाजा तोडून आत घुसले आणि..
दरम्यान, यानंतर लाथ मारुन दरोडेखोरांनी बेडरुमचा दरवाजा तोडला. यानं देशमुख कुटुंबीय धाडकन जागे झाले. यावेळी दरोडेखोरांनी थेट देशमुख यांच्या सात वर्षांच्या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं, त्याच्या गळ्यावर सुरा ठेवला आणि धमकावण्यास सुरुवात केला. तुमच्याकडे जे काही आहे, ते फटाफट द्या, नाहीतर याला मारुन टाकू, अशी धमकीच दरोडेखोरांनी दिली. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत डॉक्टर देशमुखांनी मुलाचा जीव वाचवण्यासाठी दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांना दिली. यानंतरही दरोडेखोर थांबले नाहीत. त्यांनी देशमुखांच्या घरातील कपाटाची नासधूस केली.
परिसरात खळबळ
या घटनेची माहिती पोलिसांनी तोपर्यंत कळली होती. पोलिसही देशमुखांच्या घराच्या दिशेने रवाना झाले होते. पण पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकूनच दरोडेखोरांनी हाती आलेली रक्कम आणि ऐवज घेऊन घरातून पळ काढला. आता हिंगोलीतील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान हिंगोली पोलिसांसमोर उभं ठाकलंय. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.