मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा मराठा समाजाला साद; म्हणाले, पुन्हा मुंबईला…
Manoj Jarange Patil on Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील यांनी आज हिंगोलीकरांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणासाठी आपण लढा देत राहणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला. तसंच मोर्चा घेऊन मुंबईला जाण्याबाबतही त्यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे सध्या मराठवाड्याचा दौरा करत आहेत. आज ते हिंगोलीत आहेत. यावेळी स्ठानिकांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला साद घातली आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईला जाण्याच्या तयारीत आहेत. सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा मुंबईला जावे लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
मनोज जरांगे भावूक
मनोज जरांगे पाटील पाटील भावूक झाले. भाषणा दरम्यान जरांगेना अश्रू अनावर झाले. मी माझ्या समाजासाठी लढतोय म्हणून तुम्ही आमच्या मागे का लागलात?, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझे व्हीडीओ करा, रेकॉर्डिंग आणा मी समाजापासून मागे हटत नाही. तुम्हाला एवढे वाईट कां वाटतंय की नीच वृत्तीने मागे लागलात. मला तुमच पद, पैसा नको. तुम्ही तुमचा समाज मोठा केलात मग मला माझा समाज मोठा होऊ द्या. तुम्ही कितीही केसेस टाकू द्या मी मागे सरकत नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन
मी मराठ्यांसाठी पुन्हा लढायला तयार आहे. माझा जीव देखील द्यायला तयार आहे. समाजाचा एकजूट होऊन आरक्षण देण्याची वेळ आहे. एकमेकांचे उणीधुनी काढायची वेळ नाही. राजकारण्याला वाटतं आपल्यात आणि ओबीसीत भांडण झाले पाहिजे. पण आपल्याला भांडण करायचं नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे सरसकट कुणबी आरक्षण द्या. आम्ही दिलेली सांगेसोयरेची जी व्याख्या केली त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या. साडेचार तास झाले समाज उन्हात रस्त्यावर आहे, असं मनोज जरांगे हिंगोलीत बोलताना म्हणाले.
छगन भुजबळला वाटतं, तो जेलमध्ये गेला म्हणून सगळा समाज जेलमध्ये गेला पाहिजे. छगन भुजबळचं दंगल होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. ओबीसी बांधवांचे एकावरही हात लावायचा नाही आणि ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठ्याने शांत बसायचे नाही, असंही जरांगे यावेळी म्हणाले.