जीव गेला तरी चालेल, उपोषण थांबणार नाही, आक्रमक इशारा, हिंगोलीत स्वाभिमानीचं आंदोलन पेटलं…
उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यात काही जणांची प्रकृती खालावली आहे. मात्र जीव गेला तरी चालेल पण वरील मागण्या मान्य झाल्याशिवाय उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे..
रमेश चेंडके, हिंगोलीः स्वाभिमानी (Swabhimani) शेतकरी संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाने चांगलाच पेट घेतला आहे. काल राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोलीचे (Hingoli) पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) जिल्ह्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखले तर आज गोरेगाव जिंतूर ह्या मार्गावर टायर जाळून निदर्शनं करण्यात आली. पिक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु आहे, त्याचे पडसाद मराठवाड्यातही उमटत आहेत.
काय आहे नेमकी मागणी?
हिंगोली जिल्ह्यातील मागील काही वर्षांपासून सत्ततच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र सरकारने नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. विमा कंपन्या पीक विमा देत नसल्याने 23 डिसेंबर 2022 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय मोर्चा काढत कार्यालय ताब्यात घेऊन आंदोलन केले होते..
त्या आंदोलनानंतर कृषी अधिकारी यांनी रविकांत तुपकर यांना लेखी पत्र दिलं होतं. 15 दिवसांच्या आत कंपन्यांना आदेश देऊ. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करायला सांगू, तसेच संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करू, असं आश्वासन देण्यात आलं होतं.
मात्र १५ दिवस उलटले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तसेच संबधीत कंपन्यांवर गुन्हेदेखील दाखल झालेले नाहीत. दोन्ही पैकी एक ही बाबत आश्वासन पूर्तता न झाल्याने स्वाभिमानी शेकतकरी संघटनेने पुन्हा 18 जानेवारी 2023 पासून हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
आंदोलकांचा आक्रमक पवित्रा
सरसगट पीक विमा लागू करावा, हेक्टरी 15 हजार रुपये द्यावा, मागील तीन वर्षांचा hdfc agro कडून येणारे 13 कोटी 89 लाख रुपये लवकर द्यावे, ज्यांनी ज्यांनी क्लेम केले त्यांना पोस्ट हार्वेस्टिग प्रमाणापत्र द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. ह्या उपोषणाला पाठींबा म्हणून सेनगाव तालुक्यातील भगवती येथील शेतकऱ्यांनी दि.19 जानेवारी 2023 रोजी पैनगंगा नदी पात्रात जल समाधी आंदोलन केले.
काल राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्ह्या दौऱ्यावर येत असतांना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखले तर आज सेनगाव तालुक्यातील गोरेगाव जिंतूर ह्या मार्गावर टायर जाळून निदर्शने केली. दिवसेंदिवस स्वाभिमान शेकतकरी संघटनेचे हे आंदोलन पेटत जात आहे. उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यात काही जणांची प्रकृती खालावली आहे. मात्र जीव गेला तरी चालेल पण वरील मागण्या मान्य झाल्या शिवाय उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे..