Hingoli Flood : हिंगोलीत पुरामुळं वाहतूक ठप्प, लाकडाची झोळी करून रुग्णालयात नेले, पायपीट केल्यानंतर अखेर वृद्धाचा मृत्यू
बाळापूरला उपचारासाठी नेले जात होते. मात्र, पुलावरून पाणी वाहत होते. गावकऱ्यांनी युक्ती केली.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द (Pimpri Khurd) येथील नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला झोळीत टाकून चिखल तुडवत उपचारासाठी गावकऱ्यांनी नेले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अर्धा किलोमीटर चिखल तुडवत केलेली पायपीट यामुळे व्यर्थ गेलीय. पिंपरी खुर्द येथे जाण्यासाठी कयाधू नदी लगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून हलक्या पावसातही पाणी वाहते. त्यामुळे पिंपरी खुर्द, आखाडा बाळापूर, चिखली (Chikhli) या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असते. या पुलाची उंची वाढवावी अशी जुनी मागणी आहे. सोमवारी सायंकाळी गावातील 75 वर्षीय संभाजी धांडे (Sambhaji Dhande) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुलावरून पाणी असल्याने गावकऱ्यांनी लाकडाला दोरी बांधून त्याची झोळी तयार केली. त्या झोळीत या वृद्धाला टाकून तब्बल अर्धा किलोमीटर चिखल तुडवत इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर आणण्यात आले. त्यानंतर वाहनात बसवून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या सगळ्यात वेळ गेल्याने रस्त्यातच उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती गावातील सरपंच गोविंद धांडे यांनी दिलीय.
पुलाअभावी घात झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप
काल दुपारी बारा संभाजी धांडे यांनी अस्वस्थ वाटू लागले. बाळापूरला उपचारासाठी नेले जात होते. मात्र, पुलावरून पाणी वाहत होते. गावकऱ्यांनी युक्ती केली. लाकडाची झोळी तयार केली. गोविंद धांडे, सुरेश धांडे, केशव धांडे, बबन धांडे, संदीप धांडे, रमेश धांडे, अतन शिंदे हे कामाला लागले. संभाजी धांडे यांना झोळीत बसविण्यात आले. अर्धा किलोमीटरचा रस्ता तुडवत इसापूर कालव्यावर आणण्यात आले. त्यानंतर दुचाकीवर बसवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. पुरामुळं वाहतूक बंद होती. त्यामुळं संभाजी यांनी वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. मृतक धांडे यांचा मृतदेह पुन्हा अर्धा किलोमीटर चिखल तुडवत गावकऱ्यांनी गावात आणला. या सर्व प्रकाराने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. पिंपरी खुर्द येथील पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून आहे. शासनदरबारी ही मागणी लालफितशाहीत अडकली आहे. काही दिवसांपूर्वी दोन व्यक्तींचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यामुळं गावकऱ्यांचा प्रशासनाविरोधात रोष आहे.