Accident | कंटेनर आणि ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, 4 मृतांपैकी तिघांवर जागीच काळाचा घाला
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅव्हल्स मधील अनेक जण अपघातग्रस्त वाहनांच्या खाली दाबले गेले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली.
हिंगोली : हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर आज एक भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच जीव गेला असून 24 जण जखमी झाले आहेत. पार्डीमोड शिवारात कंटेनर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. 24 जखमींपैकी 6 जण गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमी असलेल्यांना नांदेडला उपचारासाठी हलवण्यात आलंय. तर इतर जखमींना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलंय.
चार जणांवर काळाचा घाला
राजस्थान नंबर प्लेटचा (RJ 02 GB 3945) कंटेनर आणि MH 38 AF 8485 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स ही दोन्ही वाहने नांदेडकडे जात होती. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गतची हा भीषण अपघात घडला. नेमका कुणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती, की ट्रॅव्हल्स मधील 3 जण जागीच ठार झाले तर एकाला रुग्णालयात नेत असताना मृत्यूनं गाठलं.
अपघातानंतर गाड्या दूरवर फेकल्या गेल्या
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅव्हल्स मधील अनेक जण अपघातग्रस्त वाहनांच्या खाली दाबले गेले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. उपस्थित लोक आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनं हटवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहने घटनास्थळा पासून दूरपर्यंत फेकली गेली होती.
कुणाचा अपघातात मृत्यूमृतांची नावे खालील प्रमाणे –
मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अजरसोंडा येथील त्रिवेणीबाई अजरसोंडकर आणि राजप्पा दगडू अजरसोंडकर यांचा समावेश आहे. तर उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील विठ्ठल कणकापुरे यांचा तर कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील पंचफुलाबाई गजभार यांचा समावेश आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच दगावले. तर एक प्रवासी अपघातात मार लागून थेट ट्रकच्या खाली अडकला गेला. या प्रवाशाला वाचवण्यासाठी स्थानिकांनी मदत केली. ट्रकच्या खाली अडकून पडलेल्या या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्यात आले. त्याशिवाय एक महिला या अपघातात जखमी होऊन रक्तबंबाळ झाली होती.