एल्गार मेळाव्या अगोदरच वादाची ठिणगी! मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
Chagan Bhujbal | हिंगोलीत ओबीसी मेळाव्यासाठी जात असलेला मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. हे तरुण मराठा आंदोलक असल्याचे समजते. या दौऱ्यापूर्वीच छगन भुजबळ यांचा ताफा अडविण्याचा आणि मेळावा उधळण्याचा इशारा देण्यात आला होता.
नांदेड | 26 नोव्हेंबर 2023 : हिंगोली येथील दुसऱ्या ओबीसी मेळाव्यापूर्वीच नांदेडमध्ये हायहोल्टेज ड्रामा झाला. मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला. या तरुणांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज मराठवाड्यात दुसरा ओबीसी मेळाव्याचा एल्गार करण्यात आला आहे. यापूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड येथे पहिला ओबीसी मेळावा झाला होता. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामधील शाब्दिक चकमकी वाढल्या. आरोपांच्या फैरी उडाल्या. एकमेकांवर अगदी वैयक्तिक पातळीवर, खालच्या स्तरावर टीका झाली. मंत्री छगन भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. पण दोनदा त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. अर्धापुरातील पिंपळगाव पाटीजवळ त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
हिंगोलीत दुसरा एल्गार
ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीनंतर त्याला उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजाच्या संघटना पुढे आल्या आहेत. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये पहिला ओबीसी एल्गार मेळावा घेण्यात आला होता. त्यात विखारी आणि जहरी टीका करण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात दारुगोळा कामी आला होता. आता हिंगोलीत ओबीसी समाजाचा दुसरा एल्गार मेळावा आज रविवारी आयोजीत करण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. रामलीला मैदानावर ही सभा होत आहे.
स्वराज्य संघटनेचा इशारा काय
ओबीसी मेळावा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला होता. त्यामुळे पोलिसांनी हिंगोलीच्या सभास्थळी आणि नांदेड विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. छगन भुजबळ यांनी आक्रमक भाषणामुळे मराठा आंदोलकांची नाराजी ओढावून घेतली आहे. आता छगन भुजबळ या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळ मराठा आरक्षणाविरोधात नसल्याचे सांगत असले तरी मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्यास त्यांनी विरोध केला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक धुमश्चक्रीमुळे सध्या वातावरण पेटले आहे. त्यामुळे आजच्या दिवसभराच्या घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष असेल.