पुढे चोर, मागे पोलीस, अखेर बाइक सोडली, तलावात उडी मारली, हिंगोलीतल्या बंदुकधारी चोरांचा थरार….
पुढे चोर, मागे पोलीस असा हा थरार तब्बल दोन तास चालला. अखेर चोरांनी बाइक सोडून तलावात उडी मारली. मात्र पोलीस आणि ग्रामस्थांनी तलावात उतरून चोरांना काठीनं बदडलं, अन् त्यांना बेड्या ठोकल्या.
हिंगोलीः पोलिसांच्या कार्यात ग्रामस्थांनी मदत केली तर गुन्हेगारांना कशी शिक्षा मिळू शकते, याचं उदाहरण हिंगोलीत पहायला मिळालं. जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका बँकेत चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरांना पोलीस आणि ग्रामस्थांनी पकडलं. पुढे चोर, मागे पोलीस असा हा थरार तब्बल दोन तास चालला. अखेर चोरांनी बाइक सोडून तलावात उडी मारली. मात्र पोलीस आणि ग्रामस्थांनी तलावात उतरून चोरांना काठीनं बदडलं, अन् त्यांना बेड्या ठोकल्या.
जिल्हा आणि शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. व्यापारी वर्गात तसेच नागरिकांमधूनही पोलिसांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वाढत्या गुन्हेगारीविरोधात व्यापाऱ्यांनी निदर्शनंही केली होती. त्यानंतर चोरीच्या घटना रोखण्यासाठी, गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी वेगानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
काय घडलं बँकेत?
वसमत तालुक्यातील चोंढी आंबा टी पॉइंटवर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत बंदूकधारी आरोपी शिरले. बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी बँक अधिकाऱ्याकडे पैश्यांची मागणी केली. पण बँक अधिकाऱ्याने बँकेतील पैसे वाटप झाल्याचे सांगितल्यानंतर चोरट्यांनी दोनदा हवेत गोळीबार केला आणि धूम स्टाइलने पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक कलासागर यांनी तात्काळ तीन पथके नेमून वेगवेगळ्या मार्गांवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते.
तीन पथकांनी चोरट्यांची नाकाबंदी!
पोलिसांनी गावातील ग्राम सुरक्षा दलांना अलर्ट केले. तिनही पथकांतील पोलीस आरोपींच्या मागावर होते. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोथी शिवारात आरोपी पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा रस्ता अडवला . मात्र चोरांनी दुचाकी सोडून तलावात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या तीनही आरोपींचा पाठलाग करून रंगेहात पकडले. संदीप यादव आणि शाबाण अन्सारी हे दोन आरोपी उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथील आहे, तर अहेमद गुजर नावाचा तिसरा आरोपी वसमत मधील सोमवार पेठेतील आहे. अवघ्या 2 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
इतर बातम्या-