हिंगोलीचा रँचो; भंगारमधून तयार केली ऑटोचार्ज ई-बाईक, डोणवाडीच्या मारुतीचा हटके विक्रम

| Updated on: Jan 11, 2025 | 3:16 PM

Autocharge e-bike : भारतात टॅलेंटची कमी नाही असे म्हणतात. कल्पकतेला बुद्धीची जोड मिळाली की सर्व उणीवा गळून पडतात. हिंगोलीतील या तरुणाने असाच एक वेगळा प्रयोग करून दाखवला. त्याने भंगारमधून ऑटोचार्ज ई-बाईक तयार केली आहे.

हिंगोलीचा रँचो; भंगारमधून तयार केली ऑटोचार्ज ई-बाईक, डोणवाडीच्या मारुतीचा हटके विक्रम
भंगारातून ऑटोचार्ज ई-बाईक
Follow us on

हिंगोली जिल्ह्यातील या तरुणाने कल्पकतेला बुद्धीची जोड देऊन हटके ई-बाईक तयार केली. त्याने भंगारमधील साहित्यातून ऑटोचार्ज असणारी ई-बाईक तयार केली. वसमत तालुक्यातील डोणवाड्याच्या शेतकरी पुत्राने ही कामगिरी केली. मारोती विक्रम कुरूडे याच्या या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. ही ई-बाईक पाहण्यासाठी गावात गर्दी होत आहे. गावकऱ्यांनी त्याच्या या प्रयोगाची दखल घेत त्याचा कुटुंबियांसह सत्कार सुद्धा केला. ही कौतुकाची थाप अजून नवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे तो म्हणाला.

17 वर्षी तरुणांसमोर आदर्श

डोणवाडा हे केवळ 2000 लोक वस्तीचे छोटेसे गाव आहे. या गावात शहरी सोयी-सुविधा नाहीत. पण परिस्थितीला दोष न देता येथील 17 वर्षांच्या मारोतीने तरुणांसमोर आदर्श ठेवला. मारोती हा इयत्ता 11 वीत आहे. तो कळमनुरी येथील शिवराम मोघे सैनिक शाळेत शिक्षण घेत आहे. त्याचे वडिल हयात नाहीत. तर आई कुटुंबाच्या पालनपोषणासाठी शेती करतात. मारोतीला लहानपणापासून विज्ञानाचे प्रयोग करण्याचा छंद लागलेला आहे.

हे सुद्धा वाचा

अशी सुचली आयडिया

त्याला काही दिवसांपूर्वी भंगारमध्ये एक मोपेड दिसली. ही मोपेड ई-बाईक होऊ शकते असे त्याचे लक्षात आले. मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. मारोतीने भंगारातून काही साहित्य आणले. दुचाकीचे जुने टायर आणले. मग शेतातील आखाड्यावर त्याच्या प्रयोगाचा श्रीगणेशा सुरू झाला. त्याचे प्रयत्न पाहून त्याचे भावजी पण मदतीला धावले. त्यांनी त्याला आर्थिक मदत केली. सात दिवसानंतर त्याची ई-बाईक तयार झाली, तेव्हा त्याचा आनंद काही पोटात मावला नाही. त्याने तयार केलेल्या ई-बाईकवर रपेट मारली. तिची चाचणी केली.

अशी आहे ई-बाईक

ई-बाईकची चर्चा गावभर झाली. त्याचे कोडकौतुक सुरू झाले. आता तर बाहेरील गावातील लोक सुद्धा त्याची ई-बाईक पाहण्यासाठी येत आहेत. त्याने ही बाईक कशी तयार केली याची विचारपूस करत आहेत. ई-बाईकमध्ये त्याने 12 वॉल्टच्या चार बॅटरीचा वापर केला आहे. ही बाईक ऑटो-चार्ज होते. चारपैकी दोन बॅटरी बाईक चालवताना चार्ज होतात. एकदा चार्ज झाल्यावर ही बाईक जवळपास 60 किलोमीटरपर्यंत धावते. या बाईकवर दोन क्विंटलपर्यंत वजन वाहून नेता येते.