शिवकालीन संग्रहालयाची केली समृद्ध अडगळ; संतापलेल्या मनसेकडून साफसफाई, अंधाराचे जाळे हटणार कसे?
दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या शिवकालीन शस्त्रांचे राज्यातील एकमेव संग्रहालय नाशिकमध्ये उभारण्यात आले आहे. मात्र, या शस्त्र संग्रहालयाची दयनीय अवस्था झाली आहे.
नाशिकः दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या शिवकालीन शस्त्रांचे राज्यातील एकमेव संग्रहालय नाशिकमध्ये उभारण्यात आले आहे. मात्र, या शस्त्र संग्रहालयाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या संग्रहालयाची मंगळवारी साफसफाई करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कालच निधन झाले. खरे तर त्यांनी आपल्या जवळची शिवकालीन शस्त्रे नाशिककरांना देऊन एक मोठा ऐतिहासिक ठेवाच सुपूर्द केला आहे. मात्र, या ठेव्याची योग्य देखभाल होत नसल्याची खंत मनसेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
राज यांच्या संकल्पनेतून निर्मिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या गंगापूररोड परिसरात शिवकालीन शस्त्रांचे संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक शिवकालीन शस्त्रे दिली. नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अमूल्य ठेवा पाहता यावा, यासाठी हे शस्त्र संग्रहालय उभारण्यात आले. मात्र, दुर्लक्षामुळे या शस्त्र संग्रहालयाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे हे संग्रहालय बंद पडले आहे. त्यामुळे आज मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या शिवकालीन शस्त्र संग्रहालयाची हातात झाडू घेऊन साफसफाई केली.
संग्रहालयात काय?
नाशिकच्या या संग्रहालयात अनेक शस्त्रे आहेत. तलवारींची माहिती, पालखी आहे. शिवाय चित्रकार वासुदेव कामत यांनी रेखाटलेली सुंदर चित्रे या ठिकाणी लावण्यात आली होती. एक छोटा लेझर शो सुद्धा सुरू असायचा. मात्र, या संग्रहालयाचे लाखो रुपयांचे बिल थकले आहे. हे संग्रहालय नेमके कुणाच्या अखत्यारित हा वाद आहे. मागे आयुक्तांनी महापालिकेने वीजबिल भरावे, असे म्हटले होते. मात्र, त्याचेही पालन झाले नाही. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा धूळ खात पडून आहे.
वीज जोडणी तोडली
शस्त्र संग्रहालयाची खूप दयनीय अवस्था झाली आहे. येथील वीजबिल थकल्याने वीज जोडणी तोडण्यात आली आहे. खरे तर महापालिकेडून या संग्रहालयाचे वीजबिल भरणे अपेक्षित आहे. मात्र, ते सातत्याने भरले जात नाही. त्यामुळे बिलाचा बोजा वाढला. शेवटी महावितरणने वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे हे संग्रहालय अंधाराच्या विळख्यात आहे. मनसेकडून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आल्याने सत्ताधारी भाजपच याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकल्पनेतून या ऐतिहासिक संग्रहालयाची निर्मिती केली गेली. स्वतः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्याकडील शिवकालीन शस्त्रठेवा या संग्रहालयाला दिला. मात्र, आता सत्तेत असलेल्या भाजपकडून या संग्रहालयाची देखभाल ठेवली जात नाही. – दिलीप दातीर, शहर अध्यक्ष, मनसे
इतर बातम्याः