‘त्या’ महिलेनेच अंगातील झगा काढला, गृहमंत्र्यांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात त्यादिवशी नेमकं काय घडलं?
ळगाव वसतीगृहात पोलिसांकडून महिलांना नग्न करुन नाचवण्यात आल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे निष्पन्न झाले. | Jalgaon hostel
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या जळगाव वसतीगृह प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत जळगाव वसतीगृहात (Jalgaon hostel case) पोलिसांकडून महिलांना नग्न करुन नाचवण्यात आल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात होत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी स्पष्ट केले. (Nothing objectionable happened in Jalgaon hostel case HM Anil Deshmukh)
अनिल देशमुख यांनी गुरुवारी जळगाव वसतीगृह प्रकरणाच्या चौकशी अहवालातील माहिती विधानसभेत मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये चार महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. या वसतीगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा त्रास होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला. याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांकडून महिलांना नग्न नाचवण्यात आल्याची रत्नमाला सोनार यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख नेमंक काय म्हणाले?
याप्रकरणात ज्या महिलेने तक्रार केली आहे तिच्या नवऱ्याने अनेकदा आपली पत्नी वेडसर असल्याचे सांगितले आहे, तक्रार केली होती. तिला मनोरुग्णालयात पाठवण्यात यावे, असेही त्याने म्हटले होते. या वसतीगृहात कोणताही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. किंबहुना पोलिसांना या वसतीगृहात जाण्याची परवानगी नाही. 20 फेब्रुवारीला या वसतीगृहात मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या झग्याचा त्रास व्हायला होत लागल्यामुळे तो काढून ठेवला.
या प्रकरणाची महिला अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी केली. त्यामध्ये पोलीस वसतीगृहात आल्याची कुठलीही नोंद नाही. तसेच पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार कुठेही आढळून आला नाही, असा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
‘खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’
जळगाव वसतीगृहात असा कोणताही प्रकार न घडल्याचे समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. याप्रकरणात ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या आरोपांमुळे राज्याची आणि वसतीगृहातील महिलांची बदनामी झाल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
तर अजित पवार यांनीही विरोधी पक्षाच्या नेत्यांना चिमटा काढला. महिलांच्याबाबत आपण कोणीही अन्याय खपवून घेणार नाही. मात्र, एखादा आरोप करताना विरोधी पक्षाने पूर्ण शहानिशा करावी, वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
शासकीय आशादीप महिला वसतीगृहातील प्रकार
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.
(Nothing objectionable happened in Jalgaon hostel case HM Anil Deshmukh)