स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा खुद्द गृहमंत्र्यांकडून सत्कार
रेल्वे पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून दहिसर रेल्वे स्थानकावर एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले.
मुंबई : रेल्वे पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून दहिसर रेल्वे स्थानकावर एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले. त्यांचा या कार्याबद्दल खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी बंगल्यावर सत्कार करण्यात आला. (Home Minister Anil Deshmukh felicitates a police officer Sujitkumar Nikam)
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून जेव्हा एखादे मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांचा, त्यांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे उद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.
राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांचा गृहमंत्री या नात्याने कुटुंब प्रमुख म्हणून पोलीस बांधवांचे मनोबल वाढवणे त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे, त्यांच्या सुख दुःखाची दखल घेणे हे आपले कर्तव्य व आपली ती नैतिक जबाबदारी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला गणपत सोलंकी हे साठ वर्षाचे गृहस्थ दहिसर येथून खारला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्यावेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती, ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रूळावर उडी मारली. परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गेले त्यांना परत फलाटावर चढता येत नव्हते. हे दृश्य तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सुजीत कुमार यांनी पाहिले.
परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून घेतले. व त्यांचा जीव वाचविला. त्यानंतर त्यांच्या मुलाला बोलून त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले. या कामगिरीबद्दल निकम यांचा सत्कार आज गृहमंत्र्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी रेल्वे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार उपस्थित होते.
पोलीस दलातील शिपाई पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत उत्तम काम करणाऱ्या तसेच समाजाप्रती आपला वेगळा तसा उमटवून पोलीस विभागाचे नाव उंचाविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांनी नेहमीच सन्मान केला आहे. कोरोना योद्धे, अद्वितीय काम करणाऱ्या नवदुर्गा, कर्तव्यदक्ष असलेले पोलीस कर्मचारी या सर्वांचा सन्मान गेले वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
हे ही वाचा
घरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी, तीही चक्क येरवडा कारागृहातून