नाशिकः अचानक OBC आरक्षणाचा विषय आला कसा, असा सवाल सोमवारी नाशिक दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. हे जितकं वाटतं, तितकं सोपं नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
तर असंच सुरू राहणार…
राज ठाकरे यांना ओबीसी आरक्षाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अचानक OBC आरक्षणाचा विषय आला कसा. हे जितकं वाटतं, तितकं सोपं नाही. कोण कोर्टात गेलं, का गेलं, हे समजून घ्यायला हवं. जातीपातीतून बाहेर येत नाही, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. मुख्य प्रश्न बाजूला राहतात. अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली अजून तरी कळलं का. गाडी ठेवणाऱ्याचा हेतू कळाला नाही. मात्र, देशमुख तुरुंगात आहेत, असे ते म्हणाले.
युतीबद्दल काय म्हणाले…
राज ठाकरे म्हणाले, 5 लाख लोकांनी भारत सोडला. हे लक्षण चांगले नाही. मात्र, हा सगळा नोटाबंदी आणि कोविडचा फटका आहे. अनेक व्यावसायिक हे देश सोडून जातायत. हे देशासाठी चांगले नाही. याचा लाखो नोकऱ्यांवर परिणाम होतो आहे आणि आपण आर्यन आणि सुशांतवर वेळ वाया घालतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी भाजप मनसे युतीबद्दल राज यांना विचारले असता ते म्हणाले की, या युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील, पण त्या चर्चांच मला माहित नाहीत. मात्र, मनसेने केलेले नाशिकमधील काम नाशिकरांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
60 वर्षे शरदचंद्रदर्शन…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, पवारांना 81 वर्षे पूर्ण होतायत हे चांगले आहे. हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आहे. देश गेली 60 वर्षे शरदचंद्र दर्शन करतोय. महाराष्ट्रात ते या वयात ज्या प्रकारे फिरतायत ते घेण्यासारखे आहे. राजकीय मतभेद असतात. मात्र, चांगल्याला चांगलं म्हंटल पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, असे म्हणत त्यांनी पवारांबद्दल कौतुकोद्गार काढले.
देशात आफ्रिकनांचे राज्य का?
राहुल गांधी यांनी देशात हिंदूंचे राज्य नाही. हिंदुत्तवाद्यांचे आहे, असे विधान केले होते. याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मग काय आता देशात आफ्रिकन लोक राज्य करताय का, असा सवाल त्यांनी केला. बिपीन रावत यांच्या अपघातावर अनेक जण संशय घेत आहेत. आपण हा घात-पात आहे असे समजले तरी ते बाहेर येणार आहे का, असा सवालही त्यांनी केला. आपल्या देशात प्रश्न उपस्थित होतात. मात्र, त्यांची उत्तरे मिळत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.