शरद पवार यांच्या नजरेतून उद्धव ठाकरे कसे ? आत्मचरित्रात काय लिहिले ?
शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 च्या घटनेचा उल्लेख या पुस्तकात आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीना सत्र सुरु केले आहे. शरद पवार यांचा हा निर्णय जसा धक्कादायक आहे त्याचप्रमाणे त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकामधूनही अनेक बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी याबरोबरच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत या पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 च्या घटनेचा उल्लेख या पुस्तकात आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे राजभवनात शपथ घेऊन सरकार स्थापन केले.
2019 ची बंडखोरी ( विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी ) माझ्या नावाने सुरू झाली. पण, माझा त्याला पाठिंबा नव्हता. सकाळी 6.30 वाजता मला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची माहिती मिळाली असे पवार यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
भाजप आणि शिवसेनेतील वाढते अंतर हे आमच्यासाठी चांगले लक्षण होते. महाविकास आघाडी सरकारचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी होईल. त्यानंतर शिवसेना नेतृत्व गमावेल याची आम्हाला कल्पना नव्हती.
उद्धव यांनी संघर्ष न करता, न लढता राजीनामा दिला त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले. केंद्र सरकार आणि राजभवन यांनी महाविकास आघाडी हटवण्याचा कट रचला, असे पवार यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. त्या चर्चेत ज्या सहजपणा असायचा. पण, सहजपणाची उणीव उद्धव यांच्याशी बोलताना जाणवली. सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळानंतर उद्धव यांचे आजारपण वाढले. त्यांच्या ( उद्धव ) प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. डॉक्टरांच्या वेळापत्रकानुसार त्यांना काम करावे लागत होते, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.