मविआला विधानसभा निवडणुकीत किती जागा? महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचं मोठं भाकीत!
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यानं मोठा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. दरम्यान यावेळी महायुतीविरोधात महाविकास आघाडी असंच चित्र पाहायला मिळत आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मतदार कोणाच्या बाजुनं कौल देणार राज्यात कोणाचं सरकार येणार महायुती की महाविकास आघाडी? याबाबत उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
जे कोणाचे सर्व्हे येत आहेत त्याच्यावरती फार विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती नाही आहे. लोकसभेला देखील सर्व्हे आले होते, महाविकास आघाडीला जागा मिळणार नाही, पण आम्ही प्रत्येक्षात राज्यात 31 जागा जिंकलो. महायुतीचे लोक कुठूनही सर्व्हे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. मी आपल्याला सांगत आहे की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे लोक चोऱ्या-माऱ्या करून जागा जिंकतात त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सावध राहायला सांगितलं आहे. आता जे सरकार आहे, ते चंद्रचूड यांच्या कृपेने किंवा पंतप्रधान मोदी, शहांच्या कृपेने बसलेले आहे. ते पुन्हा निवडून येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती, बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंच देखील पुढे सरकत नाही. तुमच्या पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोक हे अधिक चांगले आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे, तुमच्यासारखं ढोंगी प्रेम अजिबात नाही. आम्ही सातत्याने सांगत आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या का देत नाही आहात? त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.