वय किती आणि करते काय? नऊ वर्षांची ‘ती’ म्हणते मोबाईल गेम नको, मला हवे साहसी खेळ
मोबाईल खेळण्याच्या वयात ही लहानगी लाठी काठी असे साहसी खेळ खेळत आहे. गावात तसे प्रशिक्षण घेण्याची कोणतीही सुविधा नसताना या मुलीने त्याचे तंत्र आत्मसात केलेच, शिवाय आतापर्यंत तिने सुमारे ४०० मुलांना साहसी खेळाचे शिक्षण दिले.
संगमनेर : 26 ऑगस्ट 2024 | लहान मुलांमध्ये मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या मोबाईल गेममुळे त्यांच्या डोळ्यांवर आणि त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहेत. लहान वयातील मुले तासनतास ऑनलाइन गेम खेळत असतात. त्याचे मुलांवर दीर्घकाळ परिणाम होत आहेत. मुले अभ्यासात कमी पडतात. त्यांच्या कामात एकाग्र चित्त ठेवू शकत नाहीत. त्यांचे हे मोबाईल गेमचे व्यसन कमी करणे आवश्यक असतानाच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावातील शोर्या सरोदे ही इयत्ता 4 थी मध्ये शिकत आहे. नऊ वर्षाची ही चिमुकली शौर्या सरोदे आपल्या गावातील मुला-मुलीना साहसी खेळाचे प्रशिक्षण देत आहे. लाठी, काठी आणि साहसी खेळाची प्रशिक्षक बनलीय.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला दरवर्षी शौर्या सरोदे आपल्या वडिलांसोबत शिवनेरी किल्ल्यावर जाते. तेथे साहसी खेळ करताना तिने काही तरूण आणि तरूणींना बघितले. ते पाहून तिने वडीलांकडे साहसी खळे शिकण्याची इच्छा व्यक्त केली.
शौर्या हिच्या गावात तशी कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे वडिलांनी स्वतः मोबाईलवर विविध व्हिडीओ पहिले. त्याचा अभ्यास केला आणि ते आपल्या मुलीचे शिक्षक झाले. त्यांनी शौर्या हिला लाठी काठी, कराटे अशा साहसी खेळांमध्ये पारंगत केले.
शौर्या स्वतः या साहसी खेळात पारंगत झाली. मात्र, इतक्यावर न थांबता तिने आपल्या गावातील मुलामुलींना या साहसी खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. लाठी काठीसह शौर्या उत्तम जलतरण पटू आहे. स्केटिंग आणि बॉक्सिंगचाही ती सराव करतेय.
शहरी भागात पैसे खर्च करून मुले कराटे, लाठी – काठी, साहसी खेळाचे शिक्षण घेतात. मात्र, ग्रामीण भागात तसे प्रशिक्षण मिळत नाही. आपल्या शिक्षणाचा इतरांनाही फायदा व्हावा असा शौर्याचा यामागील मानस आहे. मुलींनी स्वरक्षणाचे धडे घ्यायला हवेत, जीवनात कधी कोणता वाईट प्रसंग येईल आणि त्यास आपण कसे तोंड द्यावे यासाठी लाठी-काठीसह साहसी खेळाचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. गावातील मुलांना प्रशिक्षण देताना समाधान मिळते. मला मोठे होऊन उत्तम खेळाडू बनायचे आहे अशी इच्छा शौर्या हिने व्यक्त केली.
शौर्या वडिलांच्या मदतीने साहसी खेळत निपुण झाली. त्याचा फायदा गावातील मुलांना होतो. ज्या ज्या वेळी संकटात आलो त्या त्या वेळी स्त्री शक्तीने त्याचा सामना केला आहे. शौर्यादेखील आज असाच आदर्श निर्माण करत स्त्री शक्तीला मजबूत करतेय अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी दिली. तर, शौर्या हिने आत्तापर्यंत 400 हून अधिक मुलांना प्रशिक्षण दिले अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली.