वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी कशी मिळाली? कोर्टात नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम समोर
सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत. मग जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे.
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांची हत्या होऊन २२ दिवस उलटले आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. याप्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. तर दुसरीकडे बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड सीआयडीला शरण आला. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली. यानंतर वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर सरकारी वकिलांनी कोर्टात काय घडलं याची माहिती दिली.
जोरदार युक्तिवाद
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी तपास वेगाने सुरु आहे. वाल्मिक कराडला काल रात्री उशीरा बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत. मग जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 15 दिवसाची कोठडी दिली. यानंतर सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोर्टात नेमकं काय घडलं, याबद्दलची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी न्यायालयाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी कशी दिली, याबद्दल सविस्तर सांगितले.
सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी सांगितला घटनाक्रम
आज वाल्मिक कराड या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने दोन कोटींची खंडणी मागितली होती. त्याबद्दलच्या चौकशीसाठी, तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासासाठी, अट्रोसिटीच्या गुन्ह्याबद्दल, तसेच त्याच्या व्हॉईस सॅम्पलसाठी आरोपीला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, असे सरकारी वकील जे. बी. शिंदे म्हणाले.
हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी १० वर्षांची, ७ वर्षांची तरतूद आहे. त्यासंदर्भात सखोल तपास करण्यासाठी आणि जो काही खून झाला त्याच्याबद्दल चौकशी करण्यासाठी ही कोठडी असेल. १५ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि ती मागणी मान्य झाली आहे, असेही सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान या सुनावणीवेळी कोर्टाबाहेर तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली. यावेळी केज कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तब्बल 7 पोलीस अधिकारी आणि 47 पोलीस कर्मचारी, 2 RCP प्लॅटून आणि 1 SRP प्लॅटून असा जवळपास 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वाल्मिक कराडचे समर्थकही तिथे जमले होते.