Pooja Khedkar : मैं आखिर तक यही कहूंगी की… वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर काय म्हणाल्या ?
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत. पूजा यांच्यावर विविध आरोप तर झालेच पण आता त्यांचं कुटुंबही अडकल्याचं दिसत आहे. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पूजा यांच्या पुण्यातील बंगल्याचं काही बांधकामही अनधिकृत असल्याचं समोर आलं
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत. पूजा यांच्यावर विविध आरोप तर झालेच पण आता त्यांचं कुटुंबही अडकल्याचं दिसत आहे. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पूजा यांच्या पुण्यातील बंगल्याचं काही बांधकामही अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता हे वादग्रस्त प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे. प्रक्षिणार्थी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा, अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. एवढेच नव्हे तर यूपीएससी परीक्षेत मुलाखतीत महाराष्ट्रासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे आली नव्हती. तसेच या परीक्षेसाठी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि उत्पन्न जास्त असताना घेतलेले क्रिमिलेअर प्रमाणपत्र या सर्व घटनांची माहिती देखील आता समोर आली आहे. यामुळे आता पंतप्रधान कार्यालयानेच या प्रकरणाची दखल घेतली असून त्याचे अहवाल पाठवण्याचे आदेश पीएमओने दिले आहेत.
सध्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाबाबात माध्यमांनी त्यांना गाठून काही प्रश्न विचारले. मात्र त्यावर काहीही बोलण्यास पूजा यांनी नकार दिला.
काय म्हणाल्या पूजा खेडकर ?
पूजा यांच्यावर झालेले आरोप, त्यांनी पदाचा केलेला गैरवापर, अधिकाऱ्यांना दिलेली धमकी अशा घटना उघडकीस आल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचेही अनेक कारनामे समोर आले आहेत. पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेतलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला. मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा खेडकर या फरार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांचं एक पथक मनोरमा यांचा शोध घेत आहे. या सर्व घटनांसंदर्भात सध्या वाशिममध्ये असलेल्या पूजा यांना माध्यमांनी सवाल विचारले. मात्र ‘मी तुमच्यासमोर काहीही बोलू शकत नाही’ हे एकच पालुपद कायम ठेवत त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. ‘ माझं जे काही उत्तरं असेल, स्पष्टीकरण असेल ते मी चौकशी समितीसमोर देईन. मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही ‘ असं त्या म्हणाल्या.
त्यांची आई मनोरमा यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि त्या फरार झाल्याबद्दलही प्रश्न विचारला असता, तेव्हाही त्यांनी उत्तर कायम ठेवलं. ‘मी या मुद्यावर काहीच बोलू शकत नाही. माझं जे उत्तर असेल ते मी पॅनेलसमोर सांगेन. सिव्हिल सर्व्हिसेसच्या नियमानुसार मला तुमच्यासमोर काहीच बोलता येणार नाही ‘ हेच पालुपद त्यांनी कायम ठेवलं.
वाशिम जिल्हा संभाजी ब्रिगेड कडून मुख्यमंत्री यांना निवेदन
दरम्यान वाशिम जिल्हा संभाजी ब्रिगेड कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची सखोल चौकशी करावी, त्यांना बडतर्फ करा अशी मागणी करण्यात आली. एवढंच नव्हे तर वाशिममध्ये असे अधिकारी ठेऊ नका अशी मागणी निवेदनाद्वारे केली. वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का? या आशयाचे पत्र राज्याचे मुख्यसचिवांना स्थानिक वकील संदीप ताटके यांनी लिहिलं आहे. हे पत्र मेल करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची वाशीममधून बदली करावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांची दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडली
पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडली असून आज जिल्हा शल्यचिकित्सक संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक होणार आहे.
अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते आज ही सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात येणार आहेत.