IAS Transfer | गृह आणि सामान्य प्रशासन विभागातही खांदेपालट, कुंटे-सौनिक यांना नवी जबाबदारी?
राज्याच्या मुख्य सचिवांच्या बदलीनंतर गृह आणि सामान्य प्रशासन विभागातही खांदेपालट होण्याची चिन्हं आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल होताना दिसत आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या बदलीनंतर गृह आणि सामान्य प्रशासन विभागातही खांदेपालट होण्याची चिन्हं आहेत. गृह विभागाची जबाबदारी सीताराम कुंटे, तर सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सुजाता सौनिक यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. (IAS Sitaram Kunte Sujata Saunik to get new responsibilities)
गृह विभागाची जबाबदारी सीताराम कुंटे यांच्याकडे सोपवले जाण्याचे संकेत आहेत. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त असलेले कुंटे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या कुंटेंच्या खांद्यावर गृह विभागाची धुरा येण्याची चिन्हं आहेत. तर त्यांच्याऐवजी सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सुजाता सौनिक यांच्याकडे सुपूर्द केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सौनिक सध्या कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहतात.
कोण आहेत सीताराम कुंटे?
- सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी
- सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत
- 2012 ते 2015 या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपद
- मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले
- महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक विभाग हाताळण्याचा अनुभव
- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून अनुभव
कोण आहेत सुजाता सौनिक?
- सुजाता सौनिक या 1987 च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी
- कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत
- केंद्रीय गृह मंत्रालयात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात सल्लागार आणि सहसचिव म्हणून चार वर्षे सेवा
- महाराष्ट्रात आर्थिक सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम पाहिले
- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव म्हणूनही अनुभव
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील वादानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. तर अजोय मेहता यांच्याकडे ठाकरे सरकारने वेगळी जबाबदारी दिली आहे. मेहता यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून एकाच दगडात दोन लक्ष्यभेद, काँग्रेस-राष्ट्रवादीची मर्जीही राखली, मेहतांची विशेष पदी नेमणूक
विद्यमान मुख्य सचिव असलेले अजोय मेहता हे 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. मात्र ठाकरे सरकारमध्ये मेहता यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मे 2019 मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती. अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही.
अजोय मेहता यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रेसमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची नावं होती. मात्र संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळाली.
VIDEO : राज्याचा प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल? राज्याच्या मुख्य सचिव पदी संजय कुमार https://t.co/U2ENa5tE9I
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2020
अजोय मेहतांवरुन महाविकास आघाडीत कुरबूर
अजोय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत कुरबूर पाहायला मिळत होती. अजोय मेहता यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध होता. बाळासाहेब थोरात यांनी तर उघड उघड बोलत, अधिकारी सर्वस्वी नाहीत, तर मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवपदाचा निर्णय घेताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विचारात घ्यावं, असं काँग्रेसने म्हटलं होतं.
संजय कुमार मुख्य सचिवपदी
संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.
कोण आहेत अजोय मेहता?
- अजोय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
- मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ते कार्यरत होते.
- अजोय मेहता राज्यात पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव होते.
- अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत.
- आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची, तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
कोण आहेत संजय कुमार?
- संजय कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
- संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
- ते मूळचे बिहारचे असून त्यांना प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव आहे.
- संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत.
- संजय कुमार गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतात.
संबंधित बातम्या :
Ajoy Mehta | अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती
IAS Sanjay Kumar | कोण आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव संजय कुमार?
पनवेल मनपा आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्तांचीही बदली
(IAS Sitaram Kunte Sujata Saunik to get new responsibilities)