पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत लढविन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची झळ मराठवाड्यात भाजपाला बसली आहे. या आंदोलनामुळे भाजपाचे जालनातील लोकसभा उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. आता दानवे मराठवाडा फिरुन चिंतन बैठका घेत आहेत.
धाराशिव – मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका लोकसभा निवडणूकांत भाजपाला मराठवाड्यात सर्वाधिक बसला. या ठिकाणी भाजपाचे तगडे उमेदवार असलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पडले. जालनातून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाले आणि याच ठिकाणी भाजपाला सर्वात मोठा हादरा बसला. तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाही, विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढविणार नाही. मात्र पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असे स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर भाजपाचे महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचे आयोजन सुरु आहे. याच अनुषंगाने माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की मला पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायतची निवडणूक देखील लढून काम करेन असे ते स्पष्ट म्हणाले.
अब्दुल सत्तार कोणत्या दिशेला उभे राहतात त्यावर..
अब्दुल सत्तार नेमकं कोणत्या दिशेने तोंड करून उभे राहतात त्यावर त्यांना विधानसभेला निवडून आणायचे की पाडायचे ? हे ठरवणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. मी नेहमीप्रमाणे पूर्वेला देवदर्शनासाठी उभा राहतो आणि देवदर्शन घेतो. ते नेहमी पश्चिमेला तोंड करून उभे राहतात ते जर पूर्वेला आमच्या बाजूला तोंड करून उभे राहिले. तर मला आदेश आला तर मी त्यांचा प्रचार करेन. ते जर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले तर विरोधात प्रचार करेल. मात्र ते कोणती भूमिका घेतात यावर मी ठरवणार असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.