राज ठाकरे आधी चर्चेला आले असते तर…चित्र वेगळं असतं
मनसे प्रमुख राज ठाकरे आधी चर्चेला आले असते तर लोकसभेसाठी जागा मिळाल्या असत्या, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी ही खात्रीलायक माहिती दिली आहे. मात्र राज ठाकरे हे अंतिम टप्प्यात चर्चेसाठी आल्याने चर्चा होऊ शकली नाही, असेही सूत्रांनी सांगितले. ते आधीच चर्चेसाठी आले असते तर वेगळं चित्र दिसलं असतं.
मनसे प्रमुख राज ठाकरे आधी चर्चेला आले असते तर लोकसभेसाठी जागा मिळाल्या असत्या, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी ही खात्रीलायक माहिती दिली आहे. मात्र राज ठाकरे हे अंतिम टप्प्यात चर्चेसाठी आल्याने चर्चा होऊ शकली नाही, असेही सूत्रांनी सांगितले. ते आधीच चर्चेसाठी आले असते तर वेगळं चित्र दिसलं असतं अशी चर्चा सध्या आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेशही त्यांनी मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला. अमित शाहांची दिल्लीत भेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील हॉटेलमध्ये झालेली चर्चा यानंतर मनसे महायुतीमध्ये सामील होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा होती. मात्र राज ठाकरेंनी फक्त महायुतीला पाठिंबा दर्शवला आणि निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं.
लवकर चर्चा झाली असती तर तोडगा निघाला असता
राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांनी दिल्लीला जाऊन अमित शाहांशी चर्चा केली. काही काळ त्यांची महायुतीच्या नेत्यांशी चर्चा सुरू होती. मात्र ते लौकर चर्चेसाठी आले असते तर त्यांच्या वाट्यालाही काही जागा आल्या असत्या, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. ते लौकर चर्चेसाठी आले असते तर काहीतरी तोडगा निघाला असता, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी तर नाही पण विधानसभेची निवडणूक मनसे लढवणार असून तेव्हा मात्र राज ठाकरे यांना फायदा मिळू शकतो अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली.
महायुतीला पाठिंबा देण्याबाबत राज ठाकरे काय म्हणाले ?
“आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विचार करायचा असतो. पण मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो. म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे जाहीर करतो”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
का फिस्कटली बोलणी ?
19 मार्चला दिल्लीत अमित शाहांसोबत राज ठाकरेंची बैठक झाली. अमित शाहांच्या बैठकीत लोकसभेच्या 2 जागा देण्याचं ठरलं होतं. महाराष्ट्रातल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी बोला असं शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. त्यानुसार 21 मार्चला मुंबईतल्या ताज लॅड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत राज ठाकरेंची दीड तास बैठक झाली. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरेंसमोर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती समोर आली.
मात्र रेल्वे इंजिनशिवाय लढणार नाही यावर राज ठाकरे ठाम राहिले आणि अखेर महायुतीत न येता बाहेरून पाठींबा जाहीर केला. चिन्हाचा प्रस्ताव आपल्याला मान्य नव्हता असं राज ठाकरेंनी म्हटल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी भाजपची बाजू स्पष्ट केली. आम्ही राज ठाकरेंसमोर कमळच चिन्हाचा प्रस्ताव ठेवलाच नव्हता आणि तसं करणारही नाही असं बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंचं हेच वक्तव्य धनुष्यबाण चिन्हाच्या प्रस्तावाचा पुष्टी देतं.
धनुष्यबाण चिन्हावर जर राज ठाकरेंनी उमेदवार दिले असते तर मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हाच्या अस्तित्वावरच सवाल उपस्थित झाला असता. ते राज ठाकरेंना मान्य होणारं नव्हतंच.