IMD cyclone alert : पुन्हा चक्रीवादळ धडकणार; पुढील 48 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुन्हा एकदा चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून ऐन हिवाळ्यात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे देशातील अनेक भागांमध्ये हाड गोठवणारी थंडी पडली आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील एक आठवडा देशभरातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे, काही भागांमध्ये दाट धुकं पडणार असून, काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मिडिया रिपोर्टनुसार देशात आलेल्या थंडीच्या लाटेची अनेक कारणं आहेत, जसं की पश्चिम -उत्तर भारतामध्ये 12.6 किलोमीटरच्या उंचीवरून तब्बल 278 किमी प्रतितास वेगानं थंड वारं वाहत आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे, त्यामुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया अधिक वेगानं होत आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात हिम संकट पाहायला मिळत असून, देशातील हा भाग गारठला आहे.
दरम्यान एकीकडे थंडीचं संकट असतानाच आता हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मन्नारच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, अनुकूल वातावरणामुळे तो पुढील 24 तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि बिहारमध्ये कडक्याची थंडी पडणार आहे. तर दुसरीकडे ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूरमध्ये दाट धुकं पडणार असून, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पाँडेचेरीमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.