चर्चा तर होणारच, या गावात आहे राज्यातलं एकमेव दशानन रावणाचं मंदिर, जिथे होते दररोज रावण पूजा
ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले. पण, त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती. दहा तोंडे, 20 डोळे आणि 20 हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली.
गणेश सोनोने, अकोला | 23 ऑक्टोंबर 2023 : दृष्ट प्रवृत्तीचा विनाश, असत्यावर सत्याचा विजय म्हणून ओळख असलेला दसरा उत्सव संपूर्ण देशभरात आनंदात साजरा केला जातो. दसरा उत्सवाची परंपरा ही अनेक वर्ष आहे. यावेळी रावणरुपी प्रतिमेचे दहन केल जाते. अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होते. त्यांचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होते. दसऱ्याला त्याचे दहन केल जाते. यात आश्चर्य ते काय? मात्र, महाराष्ट्रात असंही एक गावं आहे की जिथे रावणाची पूजा केली जाते. त्यामुळे या गावाची चर्चा तर होणारच.
रावणामध्ये काही सद्गुण होते त्यामुळे या गावात रावणाची पूजा होते. तब्बल 300 वर्षांपासून या गावात ही परंपरा आजही जोपासली जात आहे. वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते. पण, काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा या गावात करण्यात येते.
रावणाची पुरातन दगडाची मूर्ती
अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यात वाडेगाव नजीक सांगोडा हे गाव आहे. गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन दगडाची मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थानही आहे.. रावण कपटी, अहंकारी होता. अमर्याद भोगलालसा आणि महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्यात असुरी वृत्ती होती. पण, रावणातील हे दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचे दर्शन होते.
महापंडित दशानन रावणाची नित्यनियमाने पूजा
तपस्वी, बुद्धिमान, शक्तीशाली, वेदाभ्यासी या गुणांमुळेच सांगोड्यात रावणाची पूजा केली जाते. हे रावणाचे मंदिर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातले एकमेव मंदिर असल्याचे बोलले जाते. महापंडित रावणाची लंकानगरी अकोलापासून हजारो किलोमीटर दूर आहे. पण, अकोला जिल्हातल्या सांगोडा गावात महापंडित दशानन रावणाची नित्यनियमाने पूजा केली जाते.
घडली दशानन रावणाची मूर्ती
300 वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात. हे ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले. पण, त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती.
दहा तोंडे, 20 डोळे आणि 20 हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. संपूर्ण महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी रावणाला दहन केले जाते. पण, या गावात रावणाची पूजा केली जाते. विशेष म्हणजे पिढ्यानपिढ्या ही परंपरा जोपासण्याचं काम या गावातील नागरिक करत आहेत.